नवी दिल्ली - पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळं आयुष्यभर दुर्लक्षित झालेल्या पेटकरांचा संघर्ष जगासमोर आला. आज मुरलीकांत पेटकर यांना ख्रिडा क्षेत्रातील प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. याबद्दल त्यांनी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मिळालेल्या सन्मानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अर्जुन पुरस्कार स्वीकारण्यासाठी सज्ज असणाऱ्या या महान खेळाडूनं निर्माते साजिद नाडियाडवाला यांना पूर्ण श्रेय दिलं. "हा पुरस्कार साजिद नाडियाडवाला यांच्यामुळे जाहीर केला जात आहे कारण अपंगांना इतका मोठा सन्मान कोणीही देत नाही. साजिद नाडियाडवाला यांच्यामुळे मला जगात मान्यता मिळत आहे," असं मुरलीकांत पेटकर यांनी सांगितलं.
'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळं मुरलीकांत पेटकर यांची ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि भारतीय सैन्याचा अभिमानी सदस्य अशी ओळख अधोरेखीत झाल्याचं त्यांनी कबुल केलं.
"हा पुरस्कार भारत सरकार, महाराष्ट्र राज्य, रोटरी क्लब आणि इतर अनेकांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतीक आहे. या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी अपंग खेळाडूंची ओळख उंचावण्यास मदत केली. कबीर खान दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन अभिनीत 'चंदू चॅम्पियन' हा माझ्या प्रवासाबद्दलचा हा चित्रपट एका अपंग खेळाडूच्या जीवनावर प्रकाश टाकणारा पहिला चित्रपट आहे आणि मी त्यांच्या प्रयत्नांबद्दल मनापासून आभारी आहे. या चित्रपटानं अपंग खेळाडूंच्या संघर्षांना आणि कामगिरीला मान्यता दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट जागरूकता वाढविण्यात एक मैलाचा दगड बनला आहे," असं मुरलीकांत पेटकर यांनी सांगितले.
त्यापूर्वी, चंदू चॅम्पियनचे दिग्दर्शन करणारे चित्रपट निर्माते कबीर खान यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या पॅरा-जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार देण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.
'चंदू चॅम्पियन' चित्रपटाद्वारे मुरलीकांत पेटकर यांची कहाणी मोठ्या पडद्यावर आणणारे कबीर खान म्हणाले की, "मुरलीकांत पेटकर यांच्याबाबतीत हे घडत आहे याचा मला खरोखरच खूप आनंद आहे कारण चित्रपटाच्या सुरुवातीला मी ज्या गोष्टीचे एका विशिष्ट प्रकारे प्रतिनिधित्व केलं होतं ती म्हणजे गोष्ट त्यांना देशानं निराश केलं होतं. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा ते तक्रार करतील अशा प्रकारचे व्यक्ती नव्हते. पण तुम्हाला असं वाटेल की असा एक माणूस आहे जो असे म्हणत आहे की मला माझ्यामुळे मिळालेली ओळख का मिळाली नाही? आणि मला खूप आनंद आहे की ५० वर्षांहून अधिक काळानंतर त्यांना ती ओळख मिळत आहे जी त्यांना मिळायला हवी होती."
१९६५ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान मुरलीकांत पेटकर यांना नऊ गोळ्या लागल्या. त्यांच्या जखमा बऱ्या झाल्यानंतर त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा पोहणं आणि इतर खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. अडचणी असूनही, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि नेहमीच त्यांचं ध्येय साध्य करण्यावर आणि भारताला अभिमान वाटण्यावर लक्ष केंद्रित केलं. १९७२ मध्ये, त्यांनी भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता बनून इतिहास रचला.
'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील प्रेक्षकांना आवडलेल्या मुरलीकांत पेटकर यांच्या 'कधीही हार मानू नका' या वृत्तीने या पॅरा-स्विमरची लोकप्रियता वाढवली आहे. चंदू चॅम्पियन चित्रपटात मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारणाऱ्या कार्तिक आर्यननेही अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
"ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. त्याच्या बायोपिकवर काम करताना, मला त्याच्या आयुष्याबद्दल इतकी तपशीलवार आणि जवळून आणि वैयक्तिक माहिती मिळाली की त्याचा विजय खूप वैयक्तिक वाटतो. नियतीनं त्यांच्यावर टाकलेल्या सर्व आव्हानांना न जुमानता ते आयुष्यभर अतूट आणि खंबीर राहिले आहेत," असं कार्तिक आर्यननं म्हटलं.
"मी अनेक क्रीडा व्यक्तिमत्त्वांना भेटलो आहे, परंतु मुरलीकांत सरांची खिलाडूवृत्ती आणि जिद्दी वृत्ती अतुलनीय आहे. वर्षाची सुरुवातीलाच या सन्मानाबद्दल आकायला मिळणं हे आनंदमय सुरुवात होती. मुरलीकांत सर, तुम्ही आमच्या देशातील सर्वोत्तम चॅम्पियन," असं तो पुढे म्हणाला.
मुरलीकांत पेटकर यांना १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा पुरस्कार प्रदान केला जाईल.