मुंबई: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील जंगलातील आगीमुळे, अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं ऑस्कर नामांकन मतदानाची वेळ पुढे ढकलली आहे. रिपोर्टनुसार, सुमारे 10,000 अकादमी सदस्यांसाठी 8 जानेवारीपासून सुरू झालेले मतदान 12 जानेवारी रोजी संपणार होते. आता ही अंतिम मुदत 14 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. आता नामांकनांची घोषणा 19 जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. अकादमीनं सदस्यांना सीईओ बिल क्रॅमर यांच्यामार्फत तारीख बदलाची माहिती दिली आहे. या सदस्यांना एक ईमेल पाठवला गेला आहे. या ईमेलमध्ये लिहिलं आहे, 'साऊथ कॅलिफोर्नियातील विनाशकारी आगीमुळे बाधित झालेल्यांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करू इच्छितो. आमचे बरेच सदस्य आणि सहकारी लॉस एंजेलिसमध्ये राहतात आणि काम करतात आता आम्ही त्यांचा विचार करत आहोत.'
ऑस्कर नामांकन मतदानाची वेळ पुढे ढकलली :याशिवाय ईमेलमध्ये तारखांचे वेळापत्रक देखील देण्यात आलं आहे. तसेच लॉस एंजेलिसमध्ये बुधवारी रात्री होणारा आंतरराष्ट्रीय फीचर शॉर्टलिस्ट स्क्रीनिंग या आठवड्याच्या अखेरीपर्यंत पुढे ढकलण्यात आला. 11 जानेवारी रोजी लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरात होणारा इन-पर्सन लॉस एंजेलिस साउंड ब्रांच बेक-ऑफ, मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट ब्रांच बेक-ऑफला रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान याप्रकरणी प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया समोर आली आहे. या घटनेबाबत तिनं म्हटलं, 'पीडित कुटुंबांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या या धाडसी लोकांना सलाम.' प्रियांकानं आपल्या पोस्टमध्ये आग विझवण्यात मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहे.