मुंबई Bigg Boss Marahi 5 :'बिग बॉस मराठी 5'चा 8वा आठवडा सध्या खूप चर्चेत आहेत. हा सीझन सुरू होऊन जवळपास 50 दिवस पूर्ण झाले आहेत. आता दिवसेंदिवस घरात खेळ हा आणखीनच रोमांचक होताना दिसत आहे. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीला घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. बिग बॉसनं दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली आहे. एका टीममध्ये अरबाज, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर आणि सूरज चव्हाण हे पाच सदस्य होते. दुसऱ्या टीममध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे आणि संग्राम चौगुले हे पाच सदस्य असल्याचं दिसलं.
निलेश साबळेचा होणार घरात प्रवेश : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये दर शनिवारी आणि रविवारी भाऊच्या धक्क्या'वर स्पर्धकांची शाळा घेतली जाते. या आठवड्यात घरात स्पर्धकांना 'भाऊचा धक्का' नाही तर मोठा धक्का मिळेल. या आठवड्यात भाऊचा धक्क्याऐवजी महाराष्ट्राचा धक्का हा स्पर्धकांना मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांना यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहेत. बिग बॉस निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये घरात 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे प्रवेश करताना दिसत आहे. घरात आल्यानंतर निलेश हा काही सदस्यांना त्याच्या विनोदी शैलीत टोमणे आणि प्रश्न विचारताना दिसत आहे.