मुंबई - Nilesh Sable Comedy Show : 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या वाक्यानं 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची सुरुवात त्याचा होस्ट आणि दिग्दर्शक निलेश साबळे करीत असे. झी मराठीवर गेली दहाएक वर्षे चालू असलेल्या या विनोदी कार्यक्रमाने आता प्रेक्षकांना अलविदा केलं आहे. परंतु 'चला हवा येऊ द्या'नं प्रेक्षकांच्या मनात घर केलंले असल्यामुळे निलेश साबळेनं एक नवीन विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरविलंय.त्याचं नाव 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हे असून त्यातून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशी खात्री त्यानं व्यक्त केली आहे. याचा फॉरमॅट 'चला हवा येऊ द्या' पेक्षा भिन्न असून नवीन कलाकारांची टीम प्रेक्षकांना हसवताना दिसेल. अर्थात 'चला हवा येऊ द्या'तील काही मंडळी आणि काही नवीन मंडळी या कार्यक्रमाचा भाग असून चित्रपटाच्या प्रोमोशन्स साठी आलेले कलाकारही प्रहसनांमधून भाग घेताना दिसतील.
या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी त्रिवेणी धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात विनोदी टायमिंगचा बादशाह भाऊ कदम, महाराष्ट्राची हास्यजत्रा गाजवलेला विनोदवीर ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार आहेत. तसेच अजूनही काही नव्या-जुन्या कलाकारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच मराठीतील सुप्रसिद्ध कलाकार भरत जाधव आणि अलका कुबल आठल्ये हे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत.
भाऊ कदम यांनी आपल्या निरागस चेहऱ्यानं आणि निखळ विनोदी अभिनयानं प्रेक्षकांना हसवलं तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध झाला. विनोदाचा हा पॅावरबाज डोस देण्यासाठी 'करून गेलो गाव' या नाटकातील जोडगोळी भाऊ कदम आणि ओंकार भोजने, 'हसताय ना ? हसायलाच पाहिजे' साठी एकत्र आले आहेत. नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला ते नव्या शोमधून पुन्हा सज्ज झालेत. ही मालिका कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.