मुंबई :साऊथ सिनेसृष्टीतील 'लेडी सुपरस्टार' म्हटली जाणारी नयनतारा आज 18 नोव्हेंबर रोजी 40 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्यावरील 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, नयनताराच्या वाढदिवशी ड्रमस्टिक्स प्रॉडक्शननं त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करून चाहत्यांना खूश केलंय. 18 नोव्हेंबर रोजी, ड्रमस्टिक्स प्रॉडक्शननं एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये या चित्रपटाचे पोस्टरसह शीर्षक आणि टीझर शेअर करण्यात आले आहे. निर्मात्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'युद्ध सुरू झाले आहे. लेडी सुपरस्टार नयनताराच्या 'रक्कई' या धमाकेदार शीर्षकाचा टीझर सादर करत आहोत. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.'
कसा आहे 'रक्कई'चा टीझर : 'रक्कई'च्या टीझरची सुरुवात एका मुलाच्या रडण्याच्या आवाजाने होते. यानंतर, मोकळ्या मैदानाची एक झलक दाखवली जाते, जिथे एका झोपडीच्या बाहेर टॉर्चसह शत्रूचे काही सैन्य असते. या दरम्यान, एका छोट्या मुलाची झलक दाखवली जाते, जो भुकेलेला असतो. यानंतर नयनताराची झलक दाखविली जाते, यात ती तिच्या शत्रूंशी लढण्यासाठी आणि आपल्या मुलाला शांत करण्याची तयारी करताना दिसते. याशिवाय ती लाल मिरची पावडर देखील तयार करताना दिसते. यानंतर, ती मुलाला दूध पाजते आणि त्याला झोपून देते. यादरम्यान शत्रूंच्या सैन्य तिच्या झोपडीकडे धाव घेतात. यानंतर ती शत्रूंशी लढण्यासाठी हातात शस्त्र घेऊन मैदानात एंट्री करते. टीझरमध्ये नयनतारा शत्रूंना ठार करताना दिसते. टीझरच्या शेवटी नयनतारा शत्रूंच्या डोळ्यात मिरची पाऊडर टाकताना दिसते.