मुंबई - Valentine Day : 'व्हॅलेंटाईन्स डे' जवळ आला आहे. या विशेष प्रसंगी अनेक कपल आपलं प्रेम हे जोडीदारासोबत व्यक्त करत असतात. आता प्रेमाची सत्यता पडताळण्याचं नवीन यंत्र म्हणजे लव्ह मीटर बाजारात दाखल झालं असून प्रेयसीला खोटे आश्वासन देणाऱ्यांसाठी हे मीटर धोक्याची घंटा ठरू शकते. तेव्हा शक्य झाल्यास 'व्हॅलेंटाईन्स डे' निमित्त प्रेमाच्या आश्वासनांची उधळण करताना सावधानता बाळगणं हे प्रेमवीरांसाठी गरजेचं ठरणार आहे.
लव्ह मीटरची क्रेझ :"मैं तेरे इश्क मे मर ना जाऊँ कही, तू मुझे आजमाने की कोशिश न कर... अशा प्रकारे 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी प्रेमवीर, प्रेयसींना अणाभाका देतात खरे, मात्र आता या आणाभाका देताना त्याची सत्यता पडताळण्याचं नवीन यंत्र लव्ह मीटर बाजारात दाखल झालं आहे. प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेणाऱ्यांसाठी हे मीटर धोक्याची घंटा ठरू शकतं. त्यामुळे प्रेमवीरांनी प्रेमाची उधळण करताना काळजी घेणं फायद्याचं राहणार आहेत. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या आठवडा 'व्हॅलेंटाईन्स' वीक म्हणून ओळखला जातो. पाश्चिमात्य देशांतील या खास दिवसांमध्ये सेलिब्रेशन केलं जातं. मागील काही वर्षांपासून भारतातही 'व्हॅलेंटाईन्स' वीक साजरा केला जातो. 'व्हॅलेंटाईन्स डे' काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच निमित्तानं बाजारामध्ये दुकाने वेगवेगळ्या, नवनवीन वस्तूंनी सजली आहेत. नाशिकमधील तरुणाई या शॉप्समध्ये गर्दी करताना दिसून येत आहे. अशातच आता प्रश्नांचे उत्तर देणारं यंत्र बाजारात दाखल झालं आहे. प्रेमाची तीव्रता मोजण्याचं लव्ह मीटर असं याचं नाव आहे. हे लव्ह मीटर अडीचशे रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यामुळे अनेकजण ते खरेदी करत आहेत.