महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आवर्जुन पाहावेत असे चित्रपट - MOVIES OF AMBEDKARI THOUGHT

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आंबेडकरी विचार पुढं घेऊन जाणारे काही चित्रपट आम्ही तुम्हाला सूचवत आहोत.

MOVIES OF AMBEDKARI THOUGHT
आंबेडकरी विचारांचे चित्रपट (Thangalan and Vaazai poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 6, 2024, 2:11 PM IST

मुंबई - भारताच्या महान घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आपल्या जीवनात दीन दलित कष्टकरी जनतेसाठी त्यांनी केलेलं कार्य हे जगातील सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. गोरगरिब जनतेला हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरुन असंख्य कार्यकर्ते जसं चालतात तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकही आपआपल्या क्षेत्रात त्यांच्या विचारांचा वारसा जोपासताना दिसतात. भारतातील अनेक भाषांमध्ये त्यांच्या विचारानं प्रेरित झालेले काही चित्रपट आहेत. आजच्या महापरिनिर्वाणदिनी आवर्जुन पाहावेत असे काही चित्रपट आम्ही आपल्याला सूचवत आहोत.

'वाझाई'

2024 मध्ये रिलीज झालेला 'वाझाई' हा तमिळ भाषेतील चित्रपट आजच्या दिवसाला पाहण्यासाठी प्राधान्य देण्यास हरकत नाही. केळीच्या बागेत काम करणाऱ्या एका शाळकरी मुलाची ही कथा आहे. आंबेडकरांच्या प्रेरणेतून शिकण्याची जिद्द बाळगणारा, सतत पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करणारा परंतु घरच्या गरिबीनं गांजलेला याचा नायक गुरं राखतो, केळीच्या बागेत घड वाहून नेण्याचं काम करतो आणि शिकतही असतो. मारी सेल्वाराज यांनी लिखित, सह-निर्मित आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. हिंदी भाषेतही याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

'थंगलान'

महपरिनिर्वाणदिनाच्या निमित्तानं पाहण्यास योग्य अशा चित्रपटांमध्ये तुम्ही थंगलान या चित्रपटाचा समावेश करु शकता. पा. रंजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा एका सोन्याच्या खाणीच्या शोधापासून सुरू होते. यामध्ये तत्कालिन काळात असलेली जाती व्यवस्था, शोषण याचं शहारे आणणारं चित्रण यात पाहायला मिळेल. या चित्रपटात विक्रम यांच्यासोबत पार्वती थिरुवुथू, मालविका मोहनन, डॅनियल कॅलटागीरोन, पशुपती आणि हरी कृष्णन यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे यात विक्रमनं पाच भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्स या ओटीटीवर तुम्ही पाहू शकाल.

'अमरन'

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित अमरन हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाहाचं समर्थन केलं. या देशाची जाती व्यवस्था बदलायची सुरूवात यापासून होऊ शकते असा विचार यामागे होता. हाच विचार पुढं घेऊन जाणारा अमरन हा चित्रपट आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन मेजर मुकुंद वरदराजन यांची भूमिका साकारत आहे आणि साई पल्लवी, भुवन अरोरा, राहुल बोस यांसारखे दिग्गज कलाकार यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. अमरन हे शिव आरूर आणि राहुल सिंग यांच्या इंडियाज मोस्ट फिअरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ द मॉडर्न मिलिटरी या पुस्तक मालिकेचे रूपांतर आहे. यामध्ये मेजर वरदराजन याचं शौर्य पाहायला मिळेल. सत्यकथेवर आधारित या चित्रपटाचं सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रिमिंग सुरू आहे.

'जय भीम'

टी. जे. ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित 'जय भीम' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी सामाजिक न्यायासाठी दिलेला 'जय भीम'चा नारा शीर्षक म्हणून वापरण्यात आलाय. हा चित्रपट पोलिसांचा पक्षपातीपणा आणि उपेक्षित समाजाचं शोषण यावर भाष्य करणारा होता. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची कथा गुन्हेगार जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरुलर जमातीतील सेंगेनी आणि राजकन्नू या जोडप्याच्या जीवनाभोवती फिरते. सेंगेनी आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी चंद्रू या वकिलाची मदत घेते. या चित्रपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. 2022 मध्ये या चित्रपटाची निवड 'ऑस्कर' पुरस्काराच्या नामांकनासाठी भारताच्या वतीनं करण्यात आली होती. तुमच्यापैकी अद्याप जर कोणी हा चित्रपट पाहिला नसेल तर आजच्या 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त जरुर वेळ काढून पाहू शकता. मूळ तमिळ भाषेत असला तरी हा चित्रपट तुम्हाला 'अमेझॉन प्राईम व्हिडिओ' या ओटीटीवर हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.

प्रबोधन करणारा 'जयंती' चित्रपट

2021 मध्ये 'जयंती' या मराठी चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. खेड्यातून आणि शहारातूनही जातीचं वास्तव खूप भयानक आहे. महापुरुषांच्या जयंतीचे सोहळे धुमधडाक्यात साजरे केले जातात. सोयीचं राजकारण करणारे राज्यकर्ते अशा गोष्टींना आपल्या फायद्यासाठी मदत करत असतात. यामध्ये फसत जाणारा तरुण वर्गाच्या भविष्याची कोणालाही चिंता नसते. याच भान देणारा उत्तम चित्रपट लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी बनवला आहे. ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे, किशोर कदम आणि पॅडी कांबळे यासारख्या कालाकारांनी यात उत्तम अभिनय केला आहे. आजच्या समाजाचं जातीय वास्तव सांगत आंबेडकरी विचारांचं प्रबोधन करणारा हा सुंदर चित्रपट आजच्या दिवशी पाहणेही समोयोचित ठरु शकेल. अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटीवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकाल.

ABOUT THE AUTHOR

...view details