मुंबई -अभिनेता सलमान खाननंतर नुकतेच शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धमकी प्रकरणी छत्तीसगडच्या रायपूर येथून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्सना सतत धमक्या येत आहेत. सलमान खान सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाणावर आहे. दरम्यान, शाहरुख खानलाही जीवे मारण्याच्या धमकी आल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये अनेकजण घाबरून आहेत. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांना धमकी प्रकरणी संशयित व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे.
शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक : मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांनी सांगितलं की, शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद फैजान असून तो एक वकिल आहे. या वकिलानं शाहरुख खानकडून 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या आरोपीला रायपूर, छत्तीसगड येथून ताब्यात घेतलं आहे. शाहरुख खानला मिळालेल्या धमकीची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती. पोलीस ठाण्यातच एक फोन आल्याचे सांगण्यात आलंय. 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलिस स्टेशनच्या नंबरवर एक फोन आला आणि आरोपीनं यात म्हटलं "तो बँडस्टँडचा शाहरुख आहे, त्याला 50 लाख द्याला लावा नाहीतर मी त्याला मारून टाकेन." ती व्यक्ती कोण बोलत आहे, असं पोलिसांनी विचारलं असता त्यानं सांगितलं की, "काही फरक पडत नाही, माझे नाव हिंदुस्थानी लिहा."