मुंबई Sahil Khan :अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. बेटिंग ॲप प्रकरणी साहिल खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App case) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या 'एसआयटी'नं त्याला ताब्यात घेतलंय. साहिल खान 'द लायन बुक ॲप' नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं यापूर्वी साहिल खानची चौकशी केली होती. साहिल खाननं जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
1 मेपर्यंत पोलीस कोठडी : अभिनेता साहिल खानला शिंदेवाडी-दादर न्यायालयात हजर केले असता, त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. "मुंबई पोलिसांवर, कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि सत्य बाहेर येईल," अशी प्रतिक्रिया साहिल खाननं दिली.
40 तास केला पाठलाग : या प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एसआयटीनं साहिल खानला ताब्यात घेतलं आहे. साहिल खानला छत्तीसगडच्या जगदलपूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं आणि अटकेपासून संरक्षण न मिळाल्यानं साहिल खान मुंबईतून पळून गेला होता. तब्बल 40 तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी साहिलला पकडलं. साहिल खान वारंवार त्याचे लोकेशन बदलत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं.
अनेक सेलिब्रिटींचा हात? : याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, "या बेटिंग ॲपद्वारे लोकांची 15 हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडं आल्या. त्यानंतर, माटुंगा पोलिसांनी भारतीय दंड संहिता, जुगार कायदा, आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन, मोहित बर्मन आणि इतरांची नावे समाविष्ट केली आहेत."
साहिल खानची अनेकवेळा झाली चौकशी : पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, "याआधी गुरुवारीही महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं स्थापन केलेल्या 'एसआयटी'नं साहिल खानची चार तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, अभिनेता साहिल खान दुपारी 1 वाजता एसआयटीसमोर आला. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला व ही सर्व प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजता संपली. या प्रकरणात आपला हात नसल्याचं स्पष्टीकरण साहिल खाननं दिलंय. ईडी देखील महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई पोलिसांनी 32 जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण? : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झालाय. साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलं असून, तेथून त्याला मुंबईत आणलं जात आहे. तो एका बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे. साहिल खानवर 'लायन बुक ॲप'चा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. 'लायन बुक'ची जाहिरात केल्यानंतर भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केलं. ॲपच्या प्रचारासाठी साहिलनं आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना बोलावून भव्य पार्ट्यांचं आयोजन करायचा, असा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच या प्रकरणातील आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे पोलीस समोर आणू शकतात.
साहिल होता फरार : साहिल खानची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैदराबाद असा प्रवास करत तो अखेर छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचं पथकही त्याच्या मागावर होतं. हैदराबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर इथं आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
हेही वाचा :
- महादेव बेटिंग ॲप प्रकरण; अभिनेता साहिल खानची एसआयटीकडून दोन तास चौकशी - Mahadev Betting App Case
- महादेव बेटिंग ॲपचं मुंबई कनेक्शन, एसआयटीने पहिल्या आरोपीला ठोकल्या बेड्या