महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'डिस्को डान्सर'च्या अभिनयसामर्थ्याला सर्वोच्च पुरस्काराची दाद, मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर - Dadasaheb Phalke Award - DADASAHEB PHALKE AWARD

Dadasaheb Phalke Award : अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान असलेला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'एक्स' सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

Dadasaheb Phalke Award
दादासाहेब फाळके पुरस्कार (Mithun Chakraborty Set to Be Honoured with Dadasaheb Phalke Award (Photo: IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:17 AM IST

Updated : Sep 30, 2024, 2:39 PM IST

मुंबई - Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करून याबद्दलची घोषणा केली आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी मिथुन चक्रवर्ती यांना समारंभपूर्वक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर : 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात येईल. मिथुन चक्रवर्ती यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान दिला जाणार आहे. मिथुनदांनी आपल्या चार दशकांपेक्षा अधिक अभिनय कारकिर्दीत विविधांगी भूमिकांना न्याय दिला. हिंदी चित्रपटसृष्टीत 'डिस्को डान्स'ची रुजवात करण्याचं श्रेय मिथुनदांना जातं. डिस्को डान्सर, सुरक्षा, डान्स डान्स सारख्या चित्रपटांमधून 'डिस्को डान्सर' म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांच्या नावावर अनेक अॅक्शनपॅक्ड चित्रपटांची नोंद आहे. प्यार झुकता नहीं, प्यार का मंदिर, प्रेम प्रतिज्ञा सारख्या चित्रपटांमधून कधी रोमॅंटिक तर कधी कुटुंबवत्सल नायकाची भूमिका त्यांनी रंगवली. अनेक संवेननशील विषयांवरच्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवून दाखवलं.

वेगळेपणा ठसवला :मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमधले 180 चित्रपट फ्लॉप आहे. देशातील सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या नटांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची गणना होते. उटी मध्ये हॉटेल व्यवसाय सुरु केल्यानंतर मिथुन यांनी दरम्यानच्या काळात काळात दलाल, जल्लाद, आदमी सारख्या अनेक 'दे मार' गल्लाभरु चित्रपटांमध्ये अभिनय केला. असं असलं तरीही त्यांचा चाहतावर्ग सर्व वयोगटांत आहे. त्यांच्या 'फॅनफॉलोव्हिंग'ला ओहोटी लागली नाही, हे विशेष! अनेक चित्रपट हे मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयासाठी लक्षात राहतात.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या 'एक्स'वर पोस्टमध्ये याबद्दल घोषणा करत लिहिलं, 'मिथुनदा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीनं भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीजी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे, हे जाहीर करताना सन्मान वाटतो.' आता ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण मिथुन चक्रवर्ती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला : मिथुन यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास प्रेरणादायी आहे. मिथुन यांनी 1976 मध्ये 'मृगया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1992 साली बंगाली चित्रपट 'ताहादेर कथा' मध्ये त्यांनी साकारलेल्या शिबनाथ मुखर्जी या स्वातंत्र्यसैनिकाच्या संस्मरणीय व्यक्तिरेखेवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटली. तिसऱ्यांदा 1998 साली 'स्वामी विवेकानंद' चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कार्याची दखल 'पद्मभूषण' या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने घेतली गेली. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. चित्रपटसृष्टीशी संबंध नसलेला गौरांग चक्रवर्ती हा तरुण मिथुन चक्रवर्ती या नावाने चित्रपटसृष्टीत दाखल झाला तेव्हा तत्कालीन अनेक सुपरस्टार्सने त्याच्या सावळ्या रंगावर टीका केली, अभिनयक्षमतेविषयी शंका उपस्थित केल्या. मात्र हा तरुण सर्वांना पुरुन उरला. राजकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर सारख्या प्रस्थापित कलाकारांसमोर ताकदीने उभा राहतो आणि स्वतःच्या नावाचा ब्रॅंड तयार करतो, हेच मुळात प्रेरणादायी आहे. मिथुन चक्रवर्ती सध्या करियरच्या उत्तरार्धात अनेक चित्रपटांमधून चरित्र भूमिका साकारत कलाप्रेमींना आपल्या अभिनयाची मेजवानी देत आहेत.

Last Updated : Sep 30, 2024, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details