मुंबई - Mithun Chakraborty :चित्रपटसृष्टीवर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर रोजी मिथुन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. या बहुमानाबद्दल कातर स्वरात त्यांनी "माझ्याकडे शब्द नाहीत, मला हसता आणि रडता येत नाही. मी कोलकात्यातील एका छोट्या भागातून आलो आहे. एवढ्या मोठ्या पुरस्कारानं माझा सन्मान होईल, असं कधीच वाटलं नव्हतं. मी एवढंच सांगेन की, हा सन्मान मी माझ्या कुटुंबाला आणि सर्व चाहत्यांना समर्पित करणार आहे." अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन : दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मिथुन चक्रवर्ती यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी 'एक्स' पोस्टमध्ये लिहिलं, 'मला आनंद होत आहे की, मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.' आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मिथुनदा यांनी हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी भाषांमधील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान मिळवणं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. मिथुनदांनी कारकिर्दीच्या 48 व्या वर्षी या स्वप्नाला गवसणी घातली.