मुंबई - मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान सध्या 'डंब बिर्याणी' या व्होडकास्टचा होस्ट म्हणून काम करतोय. मर्यादित एपिसोड असलेल्या या शोची सुरुवात त्याने चुलता सलमान खानसह केली होती. अरहानच्या या डंब बिर्याणी शोमध्ये अनेक सेलेब्रिटी येतील अशी आशा आहे. दरम्यान, अनेक कारणांमुळे चर्चेत असलेली त्याची आई मलायका अरोरा या शोमध्ये झळकणार आहे. व्होडकास्टच्या अधिकृत पेजवर अरहानने मलायकाबरोबरच्या व्हिडिओ चॅट शोची एक झलक शेअर केली होती. यामध्ये आई मलायका आणि तिचा मुलगा अरहान प्रेमातील जवळीक, लग्न आणि इतर विषयांवर चटपटीत गप्पा मारताना दिसू शकतात.
मलायका अरोरा आणि तिचा माजी पती अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान त्याच्या 'डंब बिर्याणी' या शोच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. आगामी एपिसोडमध्ये, त्याची आई मलायका अरहानच्या व्होडकास्टमध्ये दिसणार आहे. हा भाग आज बुधवारी रात्री ८ वाजता प्रसारित होईल.
'डंब बिर्याणी'च्या प्रोमो व्हिडिओमध्ये, अरहानने मलायकाला प्रश्न केला की ती "सोशल क्लाइंबर" आहे का, यावर तिनं उत्तर दिले की, 'नाही'. मग तो म्हणाला, "माझा पुढचा प्रश्न आहे, "आई, तू कधी लग्न करणार आहेस?" यावर मलायकाने अरहानची खिल्ली उडवताना म्हटले, "तुला वाटतं की तू सत्यवादी आहेस? कारण मी खूप स्पायसी असू शकते." हा प्रोमो प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक युजर्सना अरहानाने आईला विचारलेला प्रश्न आवडलेला नाही. अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे.