मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीचे ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाची बातमी आली आहे. एक महान दूरदर्शी व्यक्तीमत्व असलेल्या बेनेगल यांच्या निधनानं हिंदी सिनेसृष्टीला मोठा हादरा बसला आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. या रुग्णालयात त्यांच्यावर मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या बातमीला त्यांची मुलगी पिया बेनेगल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकाराणापासून सर्वच क्षेत्रातील मान्यवर लोक त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बनेगल यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिलंय, "भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि समांतर चित्रपट चळवळीचे खरे प्रणेते, दिग्गज चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनानं आम्हाला खूप दुःख झालं आहे. विचारप्रवर्तक कथाकथन आणि सामाजिक समस्यांशी प्रगल्भ बांधिलकी यांनी चिन्हांकित केलेल्या कला प्रकारातील त्यांचं जबरदस्त योगदान अमिट छाप सोडतं. पंडित नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर आधारित ‘भारत, एक खोज’ आणि संविधान सभेच्या चर्चेवर आधारित ‘संविधान’ या मालिका या त्यांच्या कलाकृती तरुण प्रेक्षकांसाठी एक मौल्यवान संदर्भबिंदू आहेत. 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह प्रतिष्ठित पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, त्यांचा वारसा चित्रपट निर्मात्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना आमच्या मनःपूर्वक संवेदना."
काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर यांनी श्याम बेनेगलाना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोक संदेशात लिहिलंय, "श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे, भारतातील न्यू वेव्ह सिनेमाचा एक दिग्गज, ज्यांनी अनेक सिनेमॅटिक कामगिरी मागं ठेवली आहे. माझ्या बहिणी आणि मी त्यांना आमच्या लहानपणापासून ओळखत होतो, जेव्हा ते एक जाहिरात व्यावसायिक होते आणि त्यांनी त्यांचे पहिले “अमूल बेबीज” म्हणून फोटो काढले. त्याचा प्रभाव कायम राहील, पण त्याचे जाणे हे चित्रपटसृष्टीचे आणि मानवतेचे मोठे नुकसान आहे. ओम शांती."
भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली वाहिली. "श्याम बेनेगल यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांच्या श्रेणीत त्यांचे नाव नेहमीच विशेष आदराने घेतलं जाईल. 'भारत एक खोज' सारख्या अप्रतिम मालिका आणि 'मंथन' आणि 'अंकुर' सारख्या चित्रपटांमुळे ते नेहमीच आपल्या हृदयात राहतील.", असं म्हणत तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय की, "8 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनानं खूप दुःख झालं. चित्रपट उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, हे त्यांच्या कलेचा प्रभाव दर्शविते. 'भारत एक खोज' त्यांनी सर्वसामान्यांसमोर मालिकेच्या रूपात एक पुस्तक ठेवले जे पिढ्यांना भारताची संस्कृती आणि त्या काळातील संघर्षांबद्दल तपशीलवार सांगेल. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो."