मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 'रॉकी भाई' म्हणजेच सुपरस्टार यश आज 8 जानेवारी रोजी त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. 'केजीएफ'द्वारे यशनं फक्त भारतातच नाही, तर जगभरात नाव कमावलं. यश आज सुपरस्टार आहे, मात्र यासाठी त्यानं खूप संघर्ष केला. त्याचा मार्ग खूप कठिण असून त्यानं हार मानली नाही. यशचे वडील अरुण कुमार गौडा हे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये बंगळुरूत, महानगर परिवहन महामंडळाचे बस चालक होते. याशिवाय त्याची आई ही गृहिणी होती. बस ड्रायव्हरचा मुलगा होण्यापासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंत यशची कहाणी प्रेरणादायी आहे. आज या विशेष दिवशी आम्ही, तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती देणार आहोत.
यशला मिळालं 'या' चित्रपटामधून स्टारडम :कन्नड सुपरस्टार यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन शहरातील बोवनहल्ली गावात झाला. एकेकाळी पूर्ण दिवस काम करून 50 रुपये कमावणारा यश आज कन्नड चित्रपटसृष्टीत अव्वल कलाकारांपैकी एक आहे. यशचे खरे नाव 'नवीन कुमार गौडा' असून त्याला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टी आकर्षित करत होती. त्यानं 2008 साली 'रॉकी' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 'रॉकी' चित्रपटानंतर यशला लोक पसंत करू लागले. त्याला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर त्यानं 'गोकुला', 'कल्लारे सांथे', 'तमासू', 'मोडालस्सा', 'राजधानी', 'किराथाका', आणि 'लकी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र यशला ओळख 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'गुगली' चित्रपटातून मिळाली. हा चित्रपट त्याच्यासाठी जॅकपॉट लागला. या चित्रपटानंतर यशची गणना आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. यानंतर यशनं आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.