कटरा (जम्मू आणि काश्मीर) - कॉमेडियन कपिल शर्मानं 'नवरात्रीच्या' काळात कटरा येथील वैष्णो देवी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतलं. भाविकांसह त्यानं क्रीम रंगाच्या पायजमासह लाल-प्रिंट केलेला कुर्ता परिधान करून मंदिरात प्रवेश केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असलेल्या कपिलनं माध्यमांशी संवाद करणं टाळलं आहे.
कामाच्या आघाडीवर कपिल सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नेटफ्लिक्सवरील कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. या नव्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, किकू शारदा आणि अर्चना पूरण सिंह देखील आहेत. खूप काळानंतर या शोमध्ये कपिल आणि सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा शो भव्य असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय.
द ग्रेट इंडियन कपिल शोची अधिकृत लॉगलाइन आहे की, भारतातील सर्वात प्रिय विनोदी कलाकार नेटफ्लिक्सवर एक घर शोधतात आणि त्यांच्या विलक्षण पण निष्ठावान पात्रांना घेऊन येतात. द ग्रेट इंडियन कपिल शो हा विमानतळाच्या गजबजलेल्या हद्दीत सेट केलेला अनोखा चॅट शो आहे आणि यामध्ये दर आठवड्याला प्रमुख सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येत असतात. नव्यानं सुरू झालेल्या या शोच्या सुरुवातीच्या भागात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धीमा कपूर पाहुणे म्हणून आले होते.
करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'क्रू' या अलिकडे रिलीज झालेल्या चित्रपटातही कपिल शर्मा दिसला होता. 'क्रू' ही तीन एअर होस्टेस महिलांची विमानसेवा उद्योगाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली कथा आहे. गंमत म्हणून किरकोळ चोऱ्या करणाऱ्या या तिघीही नकळत एका मोठ्या जाळ्यात अडकतात.