मुंबई- कंगना रणौतचा वादग्रस्त 'इमर्जन्सी' हा राजकीय चित्रपट आज १७ जानेवारी रोजी विरोध होत असताना प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पंजाबमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे. 'इमर्जन्सी'मध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शीख समुदायानं आक्षेप घेतल्यामुळं हा चित्रपट वादात भोवऱ्यात सापडला आणि चर्चेत राहिला आहे. पंजाबची राजधानी अमृतसरमध्ये, 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनानिमित्त कोणताही वाद टाळण्यासाठी, प्रशासनानं थिएटरबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 'इमर्जन्सी' बद्दल लोकांचे काय मत आहे आणि X वर त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे हे जाणून घ्या.
सर्वात पहिल्यांदा ज्या लोकांना 'इमर्जन्सी' हा चित्रपट कसा आवडला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात चित्रपट विश्लेषक रमेश बाला यांनी 'इमर्जन्सी' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. रमेश बाला यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, " 'इमर्जन्सी' चित्रपटाचा माझ्यावर परिणाम होईल अशी मला अपेक्षा नव्हती, कंगनानं श्रीमती इंदिरा गांधींची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे. चित्रपटातील संपूर्ण कलाकारांसह कंगनानं त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यांनी केलंलं काम अप्रतिम आहे. १९७५ च्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाची कथा उत्तम प्रकारे सादर झाली आहे, चित्रपटाचे संगीत देखील कथेला साजेसे आहे."