मुंबई - Emergency Trailer out :अभिनेत्री कंगना राणौतचा पॉलिटिकल ड्रामा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आज 14 ऑगस्ट रोजी म्हणजे 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज करून कंगनानं तिच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. 'इमर्जन्सी'च्या ट्रेलरची सुरुवात खूप जोरदार आहे. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत या चित्रपटामध्ये दिसणार आहे. ट्रेलरमध्ये कंगना ही आपली भूमिका अतिशय चोखपणे करत आहे.
'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज : ट्रेलरमध्ये आणीबाणी आणि विरोधी पक्षनेत्यांची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी काळामधील काही दृश्यं दाखवली गेली आहेत. ट्रेलरमध्ये स्टारकास्टच्या भूमिका देखील समोर आल्या आहेत. कंगना राणौतनं 'इमर्जन्सी'च्या ट्रेलर रिलीजपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं एक लांबलचक नोटसह फोटो शेअर करत लिहिलं होतं की, "मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याच्या कल्पनेपासूनच, चित्रपट निर्माता होण्यापेक्षा काहीही मोठे नाही, आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे. माझे काम तुम्हा सर्वांना दाखवताना आनंद होत आहे, चित्रपटातील तुमच्या सहभागाची मी वाट पाहात आहे, यापेक्षा अधिक काहीही नको. स्टोरी टेलर म्हणून माझ्या जगात आपले स्वागत आहे, 'इमर्जन्सी' 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल."