मुंबई - A R Rahman : 66 व्या ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये भारतीय संगीतकारांनी विजयाचा झेंडा फडकावला. सोमवार 5 फेब्रुवारी हा दिवस सर्वांसाठी खूप विशेष आहे. लॉस एंजेलिस येथे झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतीय संगीत जगतातील तीन दिग्गजांनी आपली जादू दाखवली आहे. या कार्यक्रमात जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन, ज्येष्ठ संगीतकार शंकर महादेवन आणि सेल्वा गणेश यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. जागतिक दर्जाचा हा पुरस्कार जिंकल्यानंतर अनेकजण या कलाकारांचं अभिनंदन करत आहेत. दरम्यान संगीत जगतातील दिग्गज संगीतकार एआर रहमान यांनीही या तिन्ही विजेत्यांना त्यांच्या ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एआर रहमान दिल्या शुभेच्छा : एआर रहमाननं इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी फोटो शेअर केला आहेत. या फोटोवर अनेकजण या तिन्ही दिग्गज कलाकारांचे कौतुक करत आहेत. लॉस एंजेलिसमध्ये 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 समारंभात एआर रहमान देखील उपस्थित होते. या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये एआर रहमाननं लिहिलं, ''भारतात ग्रॅमी अवॉर्ड्सचा पाऊस पडत आहे. उस्ताद झाकीर हुसैन तिसऱ्यांदा, शंकर महादेवन आणि सेल्वा गणेश यांनी पहिल्यांदा ग्रॅमी जिंकले.'' याशिवाय त्यांनी या पोस्टवर फायर इमोजीही शेअर केले आहेत. तबलावादक झाकीर हुसैन यांना त्यांच्या 'पश्तो' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीत परफॉर्मन्स श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.