मुंबई :97व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा 23 जानेवारी रोजी करण्यात आली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बोवेन यांग आणि राहेल सेनॉट यांनी केलं. 2025चा ऑस्कर पुरस्कार कॉनन ओ'ब्रायन होस्ट करतील. अकादमीचे सीईओ बिल क्रेमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी घोषणा केली की, कॉनन पहिल्यांदाच ब्रॉडकास्टवर होस्ट करणार आहे. ऑस्कर 2025 हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण एबीसीवर होईल. हा कार्यक्रम 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता ईटी (ET)वर सुरू होईल. कॅलिफोर्नियातील जंगलातील आगीमुळे ऑस्कर नामांकन घोषणेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
'अनुजा'ची होईल 'या' चित्रपटांशी स्पर्धा : दरम्यान नामांकनाच्या शर्यतीत भारतातील 10 चित्रपटांचा समावेश होता. या 10 चित्रपटांपैकी फक्त एकच चित्रपट नामांकनाच्या शर्यतीत पुढं आहे, उर्वरित 9 चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या नामांकनात, भारतीय चित्रपट 'अनुजा'ला लाइव एक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत स्थान मिळलं आहे. हा चित्रपट 'ए लीन', 'आई एम नॉट ए रोबोट', 'द लास्ट रेंजर' आणि 'द मॅन हू कुड नॉट रिमेन साइलेंट' या चित्रपटांशी स्पर्धा करेल. 'अनुजा' चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा, अनिता भाटिया, गुनीत मोंगा आणि मिंडी कलिंग यांनी केली आहेत. हा एक इंडो-अमेरिकन भाषेतील लघुपट आहे, जो एडम जे ग्रेव्स यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.