मुंबई - मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याला अनेक नवीन गोष्टींचे संकल्प सोडले जातात. मनोरंजनविश्वातही नवी नाटके, नवीन चित्रपट यांच्या घोषणा गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केल्या जातात. त्याच परंपरेला अनुसरून एलएमएस फिल्म्स प्रा. लि या निर्मितीसंस्थेने 'होय महाराजा' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचा लाडका झालेला अभिनेता प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात एका पेक्षा एक अफलातून विनोदवीरांची मांदियाळी दिसणार असून प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. 'होय महाराजा' हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रथमेश परब यानं विविधांगी व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांना आपलेसे केलेले आहे तसेच प्रेक्षकांचा लाडका असलेला 'दगडू' त्यांचं मनोरंजन करण्यात कसूर करत नाही. त्यामुळे या चित्रपटात तो नक्की काय करणार आहे याची उत्सुकता वाढली आहे. 'होय महाराजा' हा चित्रपट क्राईम-कॅामेडी प्रकारात मोडणारा असून एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेला आहे. यात एका सर्वसामान्य तरुणाची प्रेमासाठी देण्यात आलेल्या लढ्याची रोमांचक कहाणी दिसणार आहे. यात प्रथमेश परबचं वेगळं रूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अंकिता ए. लांडे प्रथमेशबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. तसेच अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौगुले असे अफलातून विनोदी कलाकार विनोदाची आतषबाजी करताना दिसणार आहेत.