मुंबई Housefull 5 Shooting :अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या कॉमेडी झोनमध्ये परत येत आहे. तो चालू वर्षात चार ते पाच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय हा 'हाऊसफुल 5' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'हाऊसफुल 5'ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये अक्षय कुमारबरोबर रितेश देशमुख आणि चंकी पांडेही दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग ऑगस्ट महिन्यात यूकेमध्ये सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटाचं शूटिंग शेड्यूल 45 दिवसांचं असणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता बॉबी देओल देखील असू शकतो. मात्र सध्या याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'हाऊसफुल 5'चं होणार क्रूझवर शूटिंग :रिपोर्टनुसार 'हाऊसफुल 5' हा फ्रँचायझीचा सर्वात महागडा चित्रपट असेल. या चित्रपटाचं बजेट जवळपास 400 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. 'हाऊसफुल 5' हा चित्रपट क्रूझवर शूट केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये जास्तीत जास्त दृश्ये क्रूझवर शूट करण्यात येणार आहेत. चित्रपटाचा क्रू सप्टेंबरमध्ये क्रूझवर शूटिंगसाठी रवाना होईल. म्हणजे दीड महिना या चित्रपटाचं शूटिंग क्रूझवर होणार आहे. यापूर्वी रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि अनिल कपूर स्टारर 'दिल धडकने दो' या चित्रपटाचं शूटिंग क्रूझवर झालं होतं. 'हाऊसफुल 5'चं दिग्दर्शन तरूण मनसुखानी करणार आहे.