मुंबई - Ghungarachi Chaal Teaser Out : मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. 'घुंगराची चाळ' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर हा सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कलासंस्कृतीचं नव्या पद्धतीनं दर्शन घडवण्यासाठी नवीन मराठी कलाकारांना संधी दिली जात आहे. दरम्यान रिलीज झालेल्या टीझरमध्ये लोक कलावंताच्या जगण्याची कहाणी दाखवली आहे. या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर आहेत. 'घुंगराची चाळ'मध्ये किरण कोरे, सुरेखा पुणेकर, निकिता भोरपकर हे कलाकार आहेत.
'घुंगराची चाळ' गाण्याचा टीझर रिलीज :या गाण्याचे निर्माते निलेश मनोहर मुणगेकर मराठी कलावंतविषयी सांगतात, ''कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा आणि मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी 100 हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. मराठी कलावंतच्या सर्वच कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!”