मुंबई -अभिनेत्री सुष्मिता सेन आज 19 नोव्हेंबर रोजी आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताच्या पहिल्या मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या सुष्मितानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याशिवाय सुष्मिताचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. आजही ती स्वतःच्या अटींवर आपले सुंदर जीवन जगत आहेत. आज या विशेष दिनानिमित्त तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
मिस युनिव्हर्ससाठी केली मेहनत : 1994 मध्ये जेव्हा सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर पोहोचली, त्यावेळी तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत ऐश्वर्या रायनं देखील भाग घेतला होता. ऐश्वर्या रायचं नाव ऐकताच सर्व स्पर्धकांनी आपले पाय मागे घेतले होते. यामध्ये सुष्मिताचाही समावेश होता. मात्र जेव्हा ती तिचा फॉर्म मागे घेत होती, तेव्हा तिच्या आईनं तिला या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले. यानंतर सुष्मिताला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी फिलिपाइन्सला जायचे होते, तेव्हा तिचा पासपोर्ट हरवला होता. यानंतर तिला समजले की, पासपोर्ट नसल्यामुळे मिस इंडियाचे आयोजक तिच्या जागी ऐश्वर्या रायला मिस युनिव्हर्समध्ये पाठवण्याचा विचार करत होते. यावर तिला राग आला होता, कारण तिनं कठोर परिश्रम घेऊन मिस इंडियाचा ताज जिंकला होता. तिच्या जागी जर दुसऱ्याला कोणाला संधी मिळत असेल, हे तिला मान्य नव्हते. यानंतर सुष्मितानं आपल्या वडिलांना पासपोर्ट बनविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. यानंतर तिच्या वडिलांनी पासपोर्टची व्यवस्था केली. सुष्मिता या स्पर्धेत पोहोचली नाही, तर तिनं एक इतिहास रचला. सुष्मितानं मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावावर केला आणि भारताचे नाव जगात उंचीवर पोहचवले.