मुंबई - 'सत्यम शिवम सुंदरम', 'डॉन', 'यादों की बारात', 'हरे रामा हरे कृष्णा', 'कुर्बानी, दोस्ताना', 'धरम वीर' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री झीनत अमान आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहे.अभिनय क्षेत्रात येण्याचा तिचा मार्ग मॉडेलिंगपासून सुरू झाला होता. फेमिना मिस इंडिया पेजेंट आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल पेजेंट जिंकल्यानंतर तिला ग्लॅमरच्या जगात ओळख मिळाली. दिसण्याची सुंदरता, बिनधास्त जगण्याची सवय आणि एकादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाची तयारी यामुळं तिच्यासाठी सिनेमाचं दार 1970 ला उघडलं. गेल्या चाळीस वर्षात तिनं शेकडो चित्रपटातून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिला देव आनंद यांच्या हरे रामा हरे कृष्णा (1971) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे नशिबाचे दारही उघडले. अब्दुल्ला (1980), अलीबाबा और 40 चोर (1980), कुर्बानी (1980), दोस्ताना (1980) आणि इंसाफ का तराजू यासारखे हिट चित्रपट तिनं 80 च्या दशकात केले. त्यापाठोपाठ लावारिस (1981), तिसरी आँख (1982), महान (1983), पुकार (1983) आणि जागीर (1984) यासारख्या चित्रपटातून ती अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून झळकली. तिच्या अभिनय प्रवासाला जोरदार सुरुवात झाली असतानाच मजहर खान बरोबर तिनं लग्नाचा निर्णय घेतला आणि तिच्या प्रगतीचा वेग मंदावला.
आयुष्यात तिला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे. लोकप्रियतेच्या कळसाला गवसणी घातलेल्या झीनत अमाननं अचानक मजहर खानशी लग्न केल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. कारण मजहर हा काही यशस्वी अभिनेता नव्हता. तरीही झीनतनं त्याची निवड केली होती. परंतु हे लग्नं तिला मानवलं नाही. अगदी पहिल्या वर्षातच तिच्या लक्षात आलं की हे लग्न करुन आपण चूक केली आहे. तरीही ती 12 वर्ष त्याच्याबरोबर राहिली. त्याच्या आजारपणात ती सेवा करत राहिली, इतकच नाही तर दुसऱ्या स्त्रीशी तो संबंध ठेवतोय हे लक्षात आल्यानंतरही तिनं निमूटपणे त्याला सहन केलं होतं. काही काळापूर्वी तिनं ही कबुली ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या एका मुलाखतीत दिली होती.
लग्नं झाल्यानंतर पहिल्या वर्षी ती प्रेग्नंट असताना तिच्या लक्षात आलं की तिचा पती मजहर खान एका महिलेबरोबर डेटिंग करत आहे. याबद्दल तत्कालिन लोकप्रिय मासिकात याबद्दल मोठा लेखही लिहून आला होता. त्यावेळी पहिल्या मुलाच्या जन्मानंतर झीनत अमानला मजहरबरोबरचं लग्नाचं नातं संपवायचं होतं, परंतु नव्यानं जन्मलेल्या मुलाचा विचार करुन ती थांबली. याबद्दल ती म्हणाली होती की, "माझ्या मुलाचा जन्म होताच, मी लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्यावर चर्चा केली, परंतु मला वाटले की माझ्या मुलाला संधी मिळावी आणि मी लग्न टिकवण्याचं ठरवलं. त्यासाठी मी खूप गोष्टी सहन केल्या. जेव्हा माझा धाकटा मुलगा 5 वर्षांचा होता, तेव्हा मी कामावर जाण्याचा विचार केला, परंतु त्यापूर्वी, मी त्याच्या ( पती मजहरच्या ) तब्येतीसाठी आणि आयुष्यासाठी लढायला सुरुवात केली आणि ती वर्षे खूप कठीण होती."
मजहर खान आजारी असताना झीनतं खूप कष्ट केलं. त्याची सेवा-सुश्रूषा केली. यासाठी तिनं मुंबईतील रुग्णालयात जाऊन इंजेक्शन कसे द्यायचे, ड्रेसिंग कसे करायचे हेही शिकून घेतलं होतं. 18 महिने ती त्यासाठी अहोरात्र राबत होती. झीनतने पुढे खुलासा केला की, मजहरच्या आरोग्याच्या समस्या दूर झाल्या असल्या तरी त्याला प्रिस्क्रिप्शन ड्रग्सचे व्यसन जडले, त्यामुळे त्याच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. अखेर झीनतनं हे लग्नाचं नात संपवण्याचा निर्णय घेतला होता. झीनत अमान आता 73 वर्षांची झालेली असली तरी आपल्या फॅशन, अभिनयाबद्दलचं प्रेम ती कधीही लपवत नाही. आजही ती नवनवे ड्रेस परिधान करुन प्रसंगी फोटोशूटही करत असते.झीनत अमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ही दिग्गज अभिनेत्री आगामी द रॉयल्समध्ये दिसणार आहे. प्रियंका घोष आणि नुपूर अस्थाना दिग्दर्शित, आठ भागांची आधुनिक भारतीय रॉयल्टी रोम-कॉम मालिका राजेशाही जीवनातील चमक आणि रोमान्सची झलक दाखवणार आहे.