मुंबई- Salsa in Marathi : भारतीय प्रेक्षक चोखंदळ असल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. भारतातील शास्त्रीय नृत्यप्रकारांबरोबरच प्रेक्षकांना पाश्चिमात्य डान्सेस सुद्धा भावतात. अनेक डान्स रियालिटी शोजमधून विविध वेस्टर्न डान्सेस सादर केले जातात, ज्यात साल्सा या नृत्यप्रकारचाही समावेश आहे. साल्सा हा लॅटिन नृत्यप्रकार असून तो साठच्या दशकात अमेरिकेत प्रसिद्ध झाला. हिंदीतही हा नृत्यप्रकार लोकप्रिय असून आता तो पहिल्यांदाच 'शनाया' या गाण्यातून मराठीत दिसणार आहे. बोल आणि गीत - संगीताच्या तालावर एका जोडीचे नृत्य अनुभवता येणार आहे.
हल्ली संगीतात नवनवीन कलाकार उदयास येताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर. त्याने या गाण्याची निर्मिती केली असून नृत्यांगना प्राजक्ता पाटील हिच्यासोबत या गाण्याच्या व्हिडिओमध्ये नृत्याभिनयही केला आहे. 'हस ना जरा शनाया' असे गाण्याचे बोल असून ते भारती न्यायाधीश यांनी हे गीत लिहिले आहे. तसेच युवा संगीतकार पिनाक न्यायाधीश याने ते संगीतबद्ध केलं आहे. विशेष म्हणजे हरिश वांगीकर आणि पिनाक न्यायाधीश हे दोघे आय टी क्षेत्रात कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्या रुक्ष वातावरणातही त्यांनी कलेची जोपासना सुरु ठेवली आहे हे विशेष.
रोमँटिक गाणं म्हटलं की त्यात प्रेम, मैत्री, रुसवे, फुगवे, भेटण्याची आस, अशा विविध भावना आपसूक येतात आणि या गाण्यातूनही प्रेमिकांचे मैत्रीतून फुलणारे प्रेम आणि प्रेमिकांच्या भावभावनांची गुंफण भारती न्यायाधीश यांनी या गाण्यात केली आहे. गीताचा भावार्थ आणि शब्द यांना सुरेल सुरांत पिनाक न्यायाधीश यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे पार्श्वगायन हरिश वांगीकर यांनी केलं आहे. या गाण्याला प्रमोदकुमार बारी यांचे दिग्दर्शन लाभलं असून कोरीओग्राफी आदेश प्रतापसिंह चौहान यांनी केली आहे. तसेच समृध्दी वाळवेकर यांनी वेशभूषा आणि स्नेहा धोंगडी यांनी मेकअपची जबाबदारी पार पाडली आहे. निर्माते आणि अभिनेता हरिश वांगीकर यांनी 'शनाया' हे मराठीतील पहिले साल्सा सॉंग असल्याचा दावा केला आहे.