महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा नाद सोडा अन् संगीतात रममाण व्हा; 'लिटिल चॅम्पचा' बालमित्रांना सल्ला - Geet Bagde Advice To Child

Geet Bagde Advice To Child : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं मोबाईलच्या जाळ्यात अडकतात. मात्र मुलांनी मोबाईलचा नाद सोडून संगीतात रममाण व्हावं, असा सल्ला सारेगमप लिटिल चॅम्पची उपविजेती गीत बागडे हिनं बालमित्रांना दिला आहे.

Geet Bagde Advice To Child
गीत प्रशांत बागडे (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 11:07 AM IST

Updated : May 30, 2024, 8:07 PM IST

अमरावती Geet Bagde Advice To Child : सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. अशातच बरीचशी बच्चे कंपनी दिवसभर मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात आपला वेळ वाया घालवतात. मुलांनी आपला महत्त्वाचा वेळ इथं तिकडं तिकडं वाया न घालवता त्या वेळेत वादन, गायन किंवा संगीत क्षेत्राशी निगडित एखादा छंद जोपासावा, असा सल्ला सारेगमप लिटिल चॅम्प्सची उपविजेती गीत प्रशांत बागडे हिनं बाल मित्रांना दिला.

लिटिल चॅम्पची उपविजेती गीत बागडे (ETV BHARAT Reporter)

गीत सारेगमप लिटिल चॅम्प्सची उपविजेती :सारेगमप लिटिल चॅम्प्सची उपविजेती गीत प्रशांत बागडे अलीकडंच तिच्या आजोळी आली होती. गीतचे आई आणि वडील संगीतक्षेत्राशी संबधित असल्यानं तिनं अगदी बालवयातच संगीताचे सूर आळवले. गीत ही 2023 मध्ये सारेगमपची उपविजेती आहे.

गीतला लहानपणापासून संगीताची आवड : गीतच्या संगीत प्रवासाविषयी सांगताना वडील प्रा. डॉ. प्रशांत बागडे म्हणाले की, "घरात आम्हा दोघांनाही संगीत क्षेत्राची आवड आहे. तिचा जन्म झाल्यापासून नैसर्गिक संगीत तिच्या कानावर पडत गेलं. वयाच्या पाचव्या वर्षी गीतच्या आवाजाचा दर्जा आमच्या लक्षात आला. तिथूनच या क्षेत्रात करिअर घडवण्याचं ठरलं. अगदी कमी वेळात तिला बऱ्याच गोष्टींचं आकलन होत आहे, आमच्या लक्षात आलं. सातत्यानं गाणं सादर केल्यानंतर तिचा आवाज दिवसेंदिवस खुलत गेला आणि तिला सारेगमचा मंच मिळाला." मोबाईलवर तासंतास वेळ घालवण्यापेक्षा एखाद्या वाद्यामध्ये, गायनामध्ये किंवा संगीतामध्ये आवड जपली तर अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते. एवढंच नाही तर मनापासून संगीत ऐकलं, तरी मनाला खूप शांतता मिळत असल्याचं, गीत सांगते.

निसर्ग सांस्कृतिक चळवळीनं केलं जंगी स्वागत :अमरावती हे गीतच्या मामाचं गाव आहे. तिच्या यशामध्ये अमरावतीकरांचा मोठा वाटा आहे. स्पर्धेदरम्यान अमरावतीकरांनी तिला भरभरून मतं दिली. गेल्या दीड वर्षापासून छत्री तलाव परिसरात निसर्ग प्रेमी सांस्कृतिक चळवळीकडून संगीत कार्यक्रम आयोजित केल्या जातात. याच संस्थेकडून गीतचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिच्या सुरांच्या मैफिलीनं अमरावतीकर अगदी भारावून गेले.

संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत मुंबईत झाली भेट :इयत्ता आठवीत शिकणारी गीत सारेगमप लिटिल चॅम्प’च्या सहा महिन्याच्या प्रवासाविषयी सांगते की, "वडिलांनी माझ्या गाण्याचे काही व्हिडिओ वाहिनीकडे पाठवले. काही दिवसानंतर मला मुंबईला बोलावलं आणि माझा सारेगमपचा प्रवास सुरू झाला. सुरेश वाडकर, डॉ. सलिल कुलकर्णी, वैशाली माडे या गायक, संगीतकार, परीक्षकांनी गीतची निवड केली. अनेक दिग्गज गायक आणि कलावंतांना भेटण्याची संधी मिळाल्याची माहिती गीतनं ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

गीतचे वडील संगीत विषयाचे विभागप्रमुख :गीत यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. तिची आई रंजना संगीत विशारद तर वडील प्रा. प्रशांत बागडे यवतमाळ येथील एका महाविद्यालयात संगीत विषयाचे विभाग प्रमुख आहेत. गायनासोबतच गीतच्या अभ्यासाकडेही विशेष लक्ष देत असल्याचं गीतच्या आई रंजना यांनी सांगितलं. सूरांची आराधना करणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्म झाल्याने मुलीचं नाव गीत ठेवल्याची माहिती गीतच्या पालकांनी दिली.

हेही वाचा :

  1. Girish Vishwa Dholak player : प्रसिद्ध ढोलक वादक गिरीश विश्वा इस्रायलमधून सुखरुप परतले, सांगितला हल्ल्याचा भीषण अनुभव; Watch video
  2. विष्णुमय जग... कार्तिकी एकादशी निमित्ताने कार्तिकी गायकवाडचे सुरेल अभंग गायन
  3. कार्तिकी एकादशी विशेष : 'सारेगामापा फेम' कार्तिकी गायकवाडसोबत सुरेल संवाद
Last Updated : May 30, 2024, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details