मुंबई :पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझनं त्याच्या दिल लुमिनाटी 2024चा शेवटचा कॉन्सर्ट हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना समर्पित केला आहे. दिलजीतनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर दिल लुमिनाटी शोचा एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलजीतनं लिहिलं, 'आजचा कॉन्सर्ट डॉ. मनमोहन सिंगजी यांना समर्पित आहे. लुमिनाटी टूर वर्ष 24'. याशिवाय त्यानं हात जोडलेला एक इमोजी देखील, आपल्या पोस्टमध्ये जोडला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलजीत मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना दिसत आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांना दिलजीतनं कॉन्सर्टमध्ये वाहिली श्रद्धांजली :दिलजीतनं व्हिडिओमध्ये म्हटलं, "आमचे माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांनी अतिशय साधे जीवन व्यतीत केले. मी त्यांचा जीवन प्रवास पाहिला. ते इतके साधे जीवन जगले की, कोणी त्यांच्याबद्दल वाईट बोलले तरी त्यांनी कधीही उत्तर दिले नाही. हे राजकारणातील करिअरमधील हे सर्वात कठीण काम आहे. त्यांनी कोणाला वाईट बोलल्यानंतर उत्तर देणं टाळलं. त्यांच्या जीवनातून आपण हे शिकले पाहिजे." यानंतर दिलजीत पुढं म्हटलं, "ते अनेकदा हात जोडून म्हणायचा की, माझे मौन हजारो उत्तरांपेक्षा चांगले आहे, मला माहित नाही की, किती प्रश्नांनी माझा सन्मान राखला आहे. आजच्या तरुणांनी हे शिकले पाहिजे असं मला वाटते. कोणीही आपल्याशी कितीही वाईट बोलले आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण जो तुमच्याबद्दल वाईट बोलतोय तो सुद्धा देवाचं रुप आहे. यावर तुमची प्रतिक्रिया कशी आहे हे पाहण्यासाठी फक्त चाचणी घेतली जात आहे, असं समजावं.'