मुंबई -IRRFAN KHNA DEATH ANNIVERSARY : हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय प्रतिभावान अभिनेता इरफान खानचा आज चौथा स्मृतिदिन आहे. त्याची शूटिंग सेटवरील उपस्थिती सहकलाकारांसाठी चैतन्याचं वातावरण निर्माण करणारी असायची. अनेक कलाकारांना त्याच्याबरोबर काम करण्याचं दडपणही असायचं तर अनेकांना ते भाग्याचं वाटायचं. अशीच काहीशी अवस्था 'पिकू' चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री दीपिका पदुकोणची झाली होती.
दीपिकानं एकदा कबूल केलं होतं की 'पिकू' चित्रपटात इरफान खानबरोबर स्क्रीन शेअर करताना भीती वाटत होती. तिला चिंता होती की इरफान तिला मुख्य प्रवाहातील अभिनेत्री समजून कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. तिनं 'पिकू' या चित्रपटात सर्वात समाधानकारक काम झाल्याचं अनेकदा सांगितलं आहे. या चित्रपटातील इरफान खानबरोबरचा तिचा आवडता क्षणही दीपिकानं शेअर केला आहे.
दीपिकाने वेळोवेळी सांगितलंय की शुजित सरकार दिग्दर्शित 'पिकू' चित्रपट तिच्यासाठी सर्वात खास आहे. या चित्रपटात तिची अमिताभ बच्चन आणि इरफान खान याच्यासह भूमिका होती. या चित्रपटातील सर्वात आवडता क्षण कुठला असं तिला 2021 मध्ये विचारलं तेव्हा तिनं इरफान खानबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता.
'पिकू' चित्रपटामध्ये दीपिकाचे पात्र तिच्या वडिलांबरोबर रोड ट्रिपला निघते. यामध्ये तिच्या वडिलांची भूमिका अमिताभ बच्चनने साकारली होती. यामध्ये इरफान खान याने राणा ही ड्रायव्हरची व्यक्तीरेखा केली होती. राणा हा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक असतो परंतु ऐनवेळी अडचण झाल्यानं तो ड्रायव्हर म्हणून अमिताभ आणि दीपिकाच्या कारचं सारथ्य करतो.
तिन्ही दिग्गज कलाकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या या चित्रपटातील भूमिकांमुळे विनोदाचा मिलाफ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. दीपिकाने एका मुलाखतीत इरफानबद्दलच्या तिच्या सुरुवातीच्या चिंतेची कबुली दिली आणि तो खूप आक्रमक आणि सहकलाकारांशी फटकून वागणारा व्यक्ती असेल, अशी त्याची प्रतिमा तिनं आपल्या मनात बनवली होती. मात्र तिला आश्चर्यकारक अनुभव आला. तो विनम्र, विनोदी आणि लाजाळू असल्याचा तिला नंतर प्रत्यय आला होता. यामध्ये त्याचं कॉमिक टाइमिंग आणि निर्विवाद प्रतिभा याची उंची तिला पाहायला मिळाली होती.
खरं तर, दीपिकाने एका मुलाखतीदरम्यान 'पिकू'च्या सिक्वेलबद्दलचेही संकेत दिले होते. परंतु, दुर्दैवाने ती गोष्ट कधीही होणार नाही कारण राणाशिवाय 'पिकू'चे जग अपूर्ण आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानच्या अनपेक्षित निघून जाण्यानं सिनेमातील एका युगाचा अंत झाला. त्याचा वारसा त्याच्या अविस्मरणीय अभिनयातून अजरामर झालाय. त्याची प्रतिभा आणि नम्रता त्याच्या सह-कलाकारांवर आणि प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकत राहणारी आहे.
हेही वाचा -
- ज्युनियर एनटीआर मुंबईत! हृतिक - सबा, रणबीर - आलिया बरोबर केली डिनर डेट - Ranbir Alia to Jr NTR Dinner Date
- प्रियांका चोप्रानं जोनास, मुलगी मालती मेरीसह घेतला सुट्टीचा आनंद, शेअर सुंदर झलक - Priyanka Chopra
- मतदान संपताच मुंबईला आल्यानं अरुण गोविल टीकेची धनी, सारवासारव करत म्हणाले... - Arun Govil