मुंबई - प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेबद्दल अनेकदा म्हटलं जातं की तो खूप कंजूष आहे आणि पैसा हुशारीनं खर्च करतो. याबरोबरच तो अभिनयाशिवाय अनेक मार्गांनी वरकमाई करत असल्याचेही समोर आलं आहे. पण नुकताच त्यानं स्वतः असा खुलासा केला आहे, ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. त्यानं सांगितलं की, तो एकदा अतिरिक्त पैसे मिळणार म्हणून एक अंत्यविधीसाठी गेला होता. हा संपूर्ण प्रकार काय आहे हे जाणून घ्या.
चंकी पांडे नुकताच कपिल शर्मा शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यात त्यानं एक मजेशीर गोष्ट सांगितली. चंकीनं सांगितले की, एक काळ असा होता की तो पैसे कमावण्यासाठी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा. एकदा तो अशाच पद्धतीनं अंत्यसंस्काराला पोहोचला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला, "एक दिवस सकाळी मला एका आयोजकाचा फोन आला. त्यानं विचारलं सर तुम्ही सध्या काय करत आहात, मी म्हणालो मी शूटिंगसाठी निघालो आहे. तो म्हणाला, साहेब, वाटेत एक छोटासा कार्यक्रम आहे जिथं तुम्हाला फक्त 10 मिनिटांसाठी यावे लागेल, पैसे चांगले आहेत. मी म्हटलं ठीक आहे मी येतो. तेव्हा त्यानं मला पांढरे कपडे घालून यायला सांगितलं, म्हणून मी पांढरे कपडे घालून गेलो. तिथं पोहोचल्यावर कुणाचा तरी मृतदेह ठेवलेला दिसला."