पुणे : सध्या वैद्यकीय क्षेत्रात आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. राज्यातील एका 14 वर्षीय मुलीवर अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या मदतीमुळं या मुलीनं स्वादुपिंडाच्या दुर्मिळ कर्करोगावर मात केली आहे. रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे झालेल्या रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे मुलगी आता पूर्णपणे बरी आहे.
रोबोटिक प्रणाली वापरून शस्त्रक्रिया : मुलीला गेल्या तीन वर्षांपासून तीव्र वेदना आणि अपचनाचा त्रास होत होता. तिच्या कुटूंबियांनी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्या सेंटर फॉर डायजेस्टिव्ह डिसीजेसमध्ये तिला दाखवलं. येथे असलेल्या वरिष्ठ गॅस्ट्रोइंटेस्टेनल आँकोसर्जन डॉ. आदित्य कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली टीमनं दा विन्सी रोबोटिक प्रणाली वापरून शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ही पहिली शस्त्रक्रिया प्रणाली पार पडली.
डॉक्टरांची प्रतिक्रिया : याबाबत डॉ.आदित्य कुलकर्णी म्हणाले, "पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियांमध्ये अनेक वेळा स्वादुपिंडाचा मोठा भाग काढला जातो. ज्यामुळं मधुमेहासारख्या गुंतागुंतीची जोखीम वाढू शकते किंवा आयुष्यभर डायजेस्टिव्ह एन्झाइम्स वर अवलंबून राहावं लागतं. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळं आम्हाला या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी दूर ठेवता आल्या."
हाय डेफिनेशन मॅग्निफिकेशन आणि 360 डिग्री मुव्हमेंटसारख्या दा विन्सी रोबोटिक प्रणालीच्या अद्ययावत वैशिष्टयांमुळं शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमला अचूकतेनं प्रक्रिया पार पाडता आली. शस्त्रक्रियेवेळी कमीत कमी रक्तस्त्राव, कमी वेदना आणि यामुळं रूग्णाची प्रगती अधिक जलदरित्या झाली.
जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा : रोबोटिक शस्त्रक्रियेमुळं मुलगी आता पूर्णपणे बरी झाली असून, मुलीच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारच्या आधुनिकीकरणामध्ये रूबी हॉल क्लिनिक अग्रस्थानी राहिलं असून भारतातील रूग्णांना जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा प्रदान करत आहे.
हेही वाचा