सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम यांनी सोमवारी सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. निवडणुकीच्या काळात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. पुण्यातील एका कुख्यात टोळीनं मला धमकी दिली आहे. याबाबत मी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझा बाबा सिद्दिकी होण्याअगोदर मला संरक्षण देऊन संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार रमेश कदम यांनी केली.
महायुतीला पाठिंबा दिल्यानं कटकारस्थान : माजी आमदार रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघात 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन निवडून आले होते. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक झाली होती. 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या काळात तुरुंगात असताना, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रमेश कदम यांनी मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिल्यानं कटकारस्थान रचलं जात आहे, असा माझा संशय आहे," अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली.
बाबा सिद्दिकीप्रमाणे हत्या होण्याअगोदर कारवाई व्हावी : "बाबा सिद्दिकी यांची ज्याप्रमाणे हत्या झाली तशी परिस्थिती माझ्यावर उद्भवू शकते. महायुतीला पाठिंबा दिल्याचा राग विरोधकांच्या मनात आहे. त्यामुळं माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी तक्रार 12 नोव्हेंबर 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं आहे. माझा बाबा सिद्दिकी होण्याअगोदर पोलिसांनी मला संरक्षण देऊन मुख्य संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळाव्या," अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी माध्यमांसमोर दिली.
हेही वाचा