मुंबई- एचएमपीव्हीच्या विषाणूची जास्त धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचा निर्वाळा सरकारतर्फे देण्यात आलाय. मात्र सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून, कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे, असे सांगण्यात आलंय. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
या विषाणूला घाबरण्याचे काही कारण नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, या विषाणूबाबत आणि एकूण परिस्थितीबद्दल राज्याच्या मंत्रिमंडळात बैठक झालीय. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये हा विषाणू सापडला होता. या विषाणूला घाबरण्याचे काही कारण नाही. कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. या विषाणूचे पाच रुग्ण आढळलेत, त्यापैकी एक बरा होऊन घरी परतलाय. हा व्हायरस धोकादायक नाही. सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार असलेल्या आणि पाच वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील रुग्णांनी काळजी घेण्याची गरज हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय. आपण कोरोनाशी लढा दिलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयांमध्ये सर्दी-खोकला असलेल्या रुग्णांची गर्दी असते, त्या ठिकाणी त्यांना विलगीकरण करून काळजी घेतली जाईल. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि पुरेशी औषधे आणि योग्य काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिलीय.
घाबरू नका, काळजी घ्या - आरोग्यमंत्री : एचएमपीव्ही विषाणू चीनमधून आल्याने भीती पसरलीय, मात्र पूर्वीपासून हा विषाणू जगभरात आहे. फार काळजी करण्याची गरज नाही. विलगीकरण, मास्कची गरज नाही. केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जाईल. सध्या केंद्राकडून गाईडलाईन आलेल्या नाहीत. गाईडलाईन आल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. सध्या अनावश्यक भीती बाळगण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण प्रसारमाध्यमांसमोर आल्याचे आबिटकर म्हणाले. फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान 8052 जणांच्या चाचण्या करण्यात आल्यात, त्यापैकी 172 जण पॉझिटिव्ह होते. ते सर्व बरे झाले, त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणालेत.
एचएमपीव्हीमुळे सौम्य आजार, पण भीतीचे कारण नाही : राज्याचे आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक म्हणाले की, हा विषाणू जुना असून, त्यापासून काही भीती नसल्याचे मत व्यक्त केलंय. एचएमपीव्हीमुळे होणारा आजार सौम्य प्रकारे होतो, हा कोणताही गंभीर आजार नाही, हा विषाणू हवेतील संसर्गाने पसरतो. संसर्ग झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. देशात 12 ठिकाणी एनआयव्ही केंद्र आहेत. त्यापैकी एक पुण्यात आहे. राज्यात 2024 मध्ये 8052 पैकी 172 एचएमपीव्ही रुग्ण सापडले होते, मात्र काळजीचे कुठलेही कारण नाही, असेही ते म्हणालेत. या विषाणूबाबत केंद्र पातळीवर नियमित आढावा घेतला जात असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. मात्र, अद्याप केंद्राकडून गाईडलाईन्स आलेल्या नाहीत, त्या आल्यावर त्याप्रमाणे लगेच कार्यवाही केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केलंय. या विषाणूमुळे सौम्य आजार होत असल्याने कोणत्याही गाईडलाईन्स अद्याप नाहीत. त्यामुळे भीती नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -