मुंबई - जुन्या काळात मित्र मैत्रीणीबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण, सवंगड्याबरोबर केलेली मजा मस्ती, किरकोळ कारणावरुन झालेली धूस-फुस, रुसवा फुगवी, भांडणं काही काळानंतर आठवलं की गंमत वाटते. शाळेचे ते जुने दिवस किती मंत्रमुग्ध करणारे धमाल होते याची आठवण कायम स्मरणात कोरलेली असते. विचार करा बऱ्याच मोठ्या काळानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींबरोबर तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियनची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
खूप वर्षानंतरची भेटीतली गंमत आणि धमाल हे सगळं अनुभवताना येणार काही गोष्टींचं वळण या रियुनियनच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेल्या मित्रांच्या आनंदाची रंगत वाढवणार की त्यांची पळता भुई थोडी होणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत.