मुंबई - बोनी कपूर निर्माण करत असलेल्या अजय देवगण स्टारर 'मैदान' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या दरम्यान बोनी कपूर यांनी त्यांचा मुलगा अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यात वाढत गेलेल्या तणावाच्या नात्याबद्दल चर्चा केली. 'मैदान' चित्रपटाच्या प्रमोशन मुलाखतीदरम्यान बोनी यांनी खुलासा केला की सलमान आणि अर्जुनच्या बदललेल्या समीकरणामुळे त्याच्या सलमान बरोबरच्या नात्यात काहीच फरक पडला नाही. त्यांचे संबंध पूर्वी होते तसेच असल्याचंही बोनीनं सांगितलं.
एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी अर्जुन आणि सलमान यांच्यात तणावाचं नातं निर्माण झाल्याची कबुली दिली. सलमानचा भाऊ अरबाज खानची पत्नी मलायका अरोराशी अर्जुन कपूरचे संबंध आहेत. सध्या तिचा अरबाजशी घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या या नात्यानं सलमान दुखावला गेला. शिवाय सलमानची बहिण अर्पिता खानशी अर्जुन कपूरचे संबंध असल्याचा पूर्वी चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांचाही 2005 मध्ये ब्रेकअप झाला. नंतरच्या काळात अर्पिता आणि आयुष शर्मा यांचे प्रेम जुळले आणि दोघांनी लग्न केलं. आता ते दोन मुलांचे पालक आहेत.
बोनी कपूर यांनी आपल्या मुलाखतीत सलमानबरोबर असलेलं त्याचं नातं कायम असल्याचं सांगितलं. अर्जुनच्या कारकिर्दीचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा त्याला मदत करणारा सलमान खानच होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं. सलमान खानमुळेच अर्जुन कपूर अभिनय करु शकला आणि त्याला आपल्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठीचा सूर सापडल्याचं बोनी कपूरने कृतज्ञतापूर्वक सांगितलं.
सलमानबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, " आई मोना कपूरला (बोनी कपूरची पहिली पत्नी) गमावल्यानंतर अर्जुन पुन्हा अभिनय करु शकेल, असं मला वाटत नव्हतं. सलमाननेच मला फोन करून सांगितलं की, ‘बोनी सर, तो अभिनेता होऊ शकेल. त्याच्यात ती क्षमता आहे.’ तो अभिनेता होईल याची जबाबदारीही सलमाननंच घेतली होती."