मुंबई - Sridevi Biopic :हिंदी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसली तरी ती चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. श्रीदेवीचे चित्रपट आणि तिची बबली शैली ही अनेकांना आवडत होती. तिला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार मानली जाते. दरम्यान श्रीदेवीच्या बायोपिकची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. श्रीदेवीचे पती निर्माते बोनी कपूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. आता श्रीदेवीच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी पडद्यावर दाखवण्याचं अनेकांचं म्हणणे आहे. मात्र बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या जीवनावर आधारित चित्रपट होऊ देणार नाही असल्याचं म्हटलं आहे.
बोनी कपूरनं श्रीदेवीच्या बायोपिकवर मौन सोडलं : नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खान आणि अर्जुन कपूरनं श्रीदेवीच्या बायोपिकवर काही खुलासे केले होते. आता यानंतर बोनी कपूरनं बायोपिकवर मौन सोडलं आहे. बोनी यांना एक मुलाखतीत श्रीदेवीच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ''श्रीदेवी ही आपले आयुष्य खासगी ठेवत होती. यामुळे कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची प्रतिमा पडद्यावर दाखवणं हे योग्य नाही. मी जिवंत असतपर्यत बायोपिक होऊ देणार नाही." दरम्यान बोनी कपूरचा 'मैदान' हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.