मुंबई- Allu Arjun Birthday Special: रुपेरी पडद्यावरचा नायक म्हणून 20 चित्रपटात भूमिका साकारलेल्या अल्लु अर्जुनच्या नावावर यापैकी 7 ब्लॉकबस्टर आणि 6 सुपरहिट चित्रपट आहेत. गेल्या दोन दशकाच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीमध्ये सर्वाधिक हिट्स देण्याचं श्रेय त्याच्याकडे जातं. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आज अल्लु अर्जुन आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक आघाडीचा लोकप्रिय नायक ते सर्वोत्कृष्ट अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास त्यानं कसा केला, अभिनयाचा वारसा लाभलेल्या मोठ्या सुपरस्टार्सच्या कुटुंबातही त्यानं स्वतःची ओळख कशी निर्माण केली यावर एक नजर टाकूया.
8 एप्रिल 1982 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई शहरात तेलुगू कुटुंबात त्याचा जन्म झाला. तेलुगु चित्रपटसृष्टीतील दिग्गज कॉमेडियन आणि निर्माता अल्लू रामलिंगय्या यांचा तो नातू आहे. त्याला सुरुवातीला अभिनयापेक्षा अॅनिमेटर होण्यात जास्त रस होता. परंतु कौटुंबिक वातावरणाच्या प्रभावाने अखेर त्याची पावलं अभिनयाच्या दिशेनं पडली.
सुरुवातीच्या काही वर्षात तो आपल्या डान्स स्टाईल आणि अॅक्शनसाठी ओळखला जात होता. असे असले तरी एक अभिनेता म्हणून त्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी आणि विविध प्रेक्षकांशी जोडण्यासाठी त्याला काही वर्षे लागली. गेल्या काही वर्षांत अल्लू अर्जुनने त्याच्या अनेख्या करिष्माई स्क्रीन अॅपिरियन्समुळे, विशेषत: तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
दिग्गज दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गंगोत्री' (2003) या चित्रपटातून त्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात केली. तो एका प्रतिष्ठित फिल्मी कुटुंबातील उदयोन्मुख कलाकार म्हणून अल्लु अर्जुननं 'मवय्यादी मोगलथूरू' या गाण्यावरील परफॉर्मन्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अल्लू अर्जुनने त्याचे वडील अल्लू अरविंद आणि सी. अश्विनी दत्त यांनी संयुक्तपणे बनवलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीचा पाया घातला.
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आर्या' (2004) चित्रपटानं अल्लु अर्जुनच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी मिळाली. या चित्रपटात अल्लू अर्जुनने 'आर्या' नावाच्या आनंदी-नशीबवान तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या सुकुमारने या रोमँटिक ड्रामा चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन्स यांचे मिश्रण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.
'आर्या' या चित्रपटाचे दाक्षिणात्य भाषेतही डबिंग करण्यात आलं आणि केरळमध्येही अल्लू अर्जुनला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली. त्याला केरळमध्ये मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग लाभले आहे. आर्याच्या यशाचे एक श्रेय संगीतकार देवी श्री प्रसाद यांनाही जातं. ज्यांनी 'फील माय लव्ह' आणि 'नुववुंटे' सारखी सुपरहिट गाणी या चित्रटाला दिली. 'आ अंते अमलापुरम' हे गाणं तर राज्याच्या सर्व सीमा ओलांडून परदेशातही हिट झालं. देशभर महाविद्यालयातील तरुणाईनं या गाण्याला प्रतिसाद दिला. पुढच्या काही वर्षामध्ये त्यानं 'बनी' (2005), 'देसमुदुरू' (2007), आणि 'पारुगु' (2008) यासारख्या कर्मशिएल सुपरहिट चित्रपटांचा सिलसिला जारी ठेवला. यातून त्याचं फिल्म इंडस्ट्रीतील स्थान भक्कम होत गेलं.
2009 मध्ये दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांची जोडी 'आर्या 2' च्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली. हा त्यांच्या 2004 मधील चित्रपटाचा सीक्वेल होता. याला प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आलेल्या त्याच्या 'वरुडू' आणि 'वेदम' चित्रपटांनाही फरसं यश मिळालं नाही. पण 'वेदम'मधील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला.