मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा सीझन हा सध्या खूप चर्चेत आहे. या रिएलिटी शोचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. सर्व स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सूरज चव्हाण हा गायक अभिजीत सावंतबरोबर बोलताना दिसत आहे. दरम्यान 'बिग बॉस'च्या घरात सूरज चव्हाणनं जेव्हा प्रवेश केला होता, त्यावेळी त्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. याशिवाय 'बिग बॉस'च्या घरातदेखील सूरज काही दिवस एकटा पडल्याचं दिसून आलं होतं. नंतर मात्र सूरजनं घरातील सदस्यांची मनं जिंकली.
सूरज घेऊन जाणार 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी ?:बिग बॉसच्या घरात सूरजनं त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितले. त्यानंतर त्याला अनेकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. घरातील टास्कमध्ये सूरजनं आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडल्यानंतर तो प्रेक्षकांना पसंत पडला. 'बिग बॉस'ने आणि शोचा होस्ट रितेश देशमुखनेदेखील सूरजचा आत्मविश्वास वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गार्डन एरियामध्ये अभिजीत सावंतबरोबर गप्पा मारताना सूरज म्हणतो, "'बिग बॉस' मराठीची ट्रॉफी मीच घेऊन जाणार, ह्यांना कोणाला हात लावू देणार नाही." यानंतर अभिजीत सावंत त्याचा आत्मविश्वास वाढवत म्हणतो, "तूच ने, तुझा हक्कच आहे."