कोल्हापूर - Dhananjay Powar family: 'बिग बॉस' मराठी या रियालिटी शोचे तीन आठवडे पूर्ण होऊन हा रोमहर्षक खेळ आता चौथ्या आठवड्यात पदार्पण करतोय. या आगळ्यावेगळ्या खेळात कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पोवार अर्थात डीपी चांगलाच चर्चेत आहे. ठसकेबाज कोल्हापुरी वाणीनं राज्यभरातील मराठी प्रेक्षकांना आपल्या खास विनोदी शैलीनं डीपी दादांनी वेड लावलं आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीच्या धनंजय पोवारच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्याच्या कुटुंबीयांना काय वाटतं? कुटुंबीयांनी खेळाबद्दल काय अपेक्षा केली आहे? विजेता होण्यासाठी धनंजयनं काय काय करावे? याबाबत व्यक्त केलेल्या भावना जाणून घेऊ या या सविस्तर मुलाखतीमधून......
धनंजय पोवारचा 'बिग बॉस' मराठी 5मधील प्रवास :महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीतील प्रसिद्ध फर्निचर व्यावसायिक अजित पोवार यांचा एकुलता एक मुलगा धनंजय पोवारनं बारावीच्या परिक्षेत सर्व विषयात 35 टक्के गुण मिळवून 20 वर्षांपूर्वी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. हट्टी आणि कमालीचा चाणाक्ष असलेल्या धनंजयचं शाळेत कधी मन लागलंच नाही. मात्र वडिलांनी आपल्या व्यवसायात त्याला दुकानाची जबाबदारी दिली. यानंतर फावल्या वेळात आणि खास करून कोरोनाच्या काळात सेलफोनचा वापर करून धनंजयनं कुटुंबातील सदस्यांबरोबर काही व्हिडिओ तयार केले होते. यानंतर हे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. याच काळात धनंजय पवारला कोल्हापूर जिल्ह्यासह अखंड महाराष्ट्रातील लोकदेखील ओळखू लागले. धनंजयचा कोल्हापुरी खास शैलीतील संवाद, आई आणि पत्नी यांच्याशी घरातील होणारे विनोदी शैलीतील वाद बघणं अनेकांना आवडत होते. गेल्या चार वर्षांत धनंजयच्या चाहत्यांचा आकडा 10 लाखांच्या घरात पोहोचला, याचीच दखल घेऊन 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी होण्याची संधी इचलकरंजीच्या या रांगड्या तरुणाला मिळाली. गेली तीन आठवडे धनंजयचा प्रवास सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांनी धनंजय या पर्वाचा विजेता होऊनच परतणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. धनंजयचा मित्र सर्जेराव खोत आणि मामा यांनीही आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
शोसाठी केला होता वडिलांनी विरोध : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मंडळी घरातच असायची. याच वेळेत धनंजय हा पत्नी कल्याणी, आई अश्विनी आणि बहिणींबरोबर व्हिडिओ बनवत होता. वडील अजित पोवार यांना त्याचं व्हिडिओ बनवणं आवडायचं नाही. वडील घरी नसताना धनंजय हा व्हिडिओ बनवत होता, या व्हिडिओद्वारे लोकांचे प्रेम आणि मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून वडिलांचा विरोध मावळला. साधारणतः वीस वर्षांपूर्वी अठरा वर्षाच्या धनंजयनं वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहरात डिजिटल बोर्ड लावले होते, या बोर्डावर 'पप्पा तुम्हाला अभिमान वाटेल आणि माझ्या नावानं तुम्हाला ओळखलं जाईल' असा भन्नाट संदेश लिहिला होता. वडील अजित पोवारांनी त्यावेळी धनंजयला चांगलंच खडसावलं होतं. मात्र आता त्यानं ते करून दाखवलं असं सांगताना वडिलांचा उर अभिमानानं भरून आला. धनंजय 'बिग बॉस' मराठीच्या शोमध्ये चांगला खेळतोय यापुढेही त्याचा दर्जेदार खेळ महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळेल, असा विश्वास वडील अजित पोवार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केलाय.