मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचे दिल्लीत निधन झालं. ते भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते आणि १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी मुंबईतील त्यांच्या स्मृतिस्थळाला देशभरातील त्यांचे अनुयायी भेट देतात. महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भीमराया तुझ्यामुळे' या गाण्यातून मनीष राजगिरेच्या स्वरांत भावस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बदललेल्या जीवनकथेचा अनोखा प्रवास या गाण्यातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांच्या अधिकारांचे अधिष्ठान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सन्मानपूर्वक श्रद्धांजली वाहणाऱ्या 'भीमराया तुझ्यामुळे' या म्युझिक व्हिडिओनं अनेकांची मनं जिंकली आहेत. डॉ. आंबेडकरांच्या संघर्षामुळे समाजातील अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली, हीच प्रेरणादायी गोष्ट या व्हिडिओतून चित्रित करण्यात आली आहे. गावातील एका तरुणाची संघर्षमय कथा या व्हिडिओत मांडण्यात आली आहे. उच्च-नीचतेच्या जुन्या प्रथांनी पछाडलेल्या समाजात वाढलेल्या या तरुणाला आईच्या कष्टांनी शिक्षण घेता आलं. गावात सहन केलेला भेदभाव त्याच्या मनात अजूनही जिवंत आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांमुळे आणि संविधानाच्या आधारानं तो शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्याला पोहोचतो. त्याच्या प्रवासाची ही कहाणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारी आहे.