मुंबई-ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी अजरामर भूमिका केल्यात. विनोदी किंवा गंभीर भूमिका असो अतुल परचुरे तितक्याच ताकदीनं त्या भूमिकेला न्याय द्यायचे. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विशेष स्थान आहे. त्यांचा झी मराठी नाट्य गौरव 2024 च्या पुरस्कारानंही सन्मान करण्यात आला होता. नातीगोती नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. नातीगोती नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच नातीगोती नाटकात स्वाती चिटणीस यांनी अतुल परचुरेंच्या आईची भूमिका साकारली होती. त्या नाटकात अतुल परचुरे यांनी गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. नातीगोती नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
व्यक्ती आणि वल्ली नाटकात भूमिका: खरं तर त्यांनी व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली होती. ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘जेडी’ या खलनायकाची त्यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरेंनी निभावली होती. विशेष म्हणजे मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झाला होता. त्यावरही मात करत ते जिद्दीने उभे राहिलेत. 'खरं खरं सांग' या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं होतं.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल वादग्रस्त विधान: अतुल परचुरे यांनी छोट्या पडद्यावरील एका विनोदी कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. अखेर अतुल परचुरेंना या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली होती. 'पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली बापू काणे ही व्यक्तिरेखा सादर करणे हाच माझा त्यामागील उद्देश होता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पुण्यशोक अहिल्याबाई होळकर या आम्हाला वंदनीय आहेत. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असंही त्यावेळी अतुल परचुरे म्हणाले होते.'