मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा 'जीवनगौरव' पुरस्कार अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडीं यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार रंगभूमीवरील योगदानासाठी स्त्री आणि पुरुष रंगकर्मींना देण्यात येतो. नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी 14 जून रोजी गो. ब. देवल पुरस्कारांचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 14 जून 2024 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलमध्ये जीवनगौरव पुरस्कारासह इतर पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करुन दिली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाट्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या रंगकर्मींचा विविध पुरस्कारानं गौरव करण्यात येतो. मात्र, मागील तीन वर्षापासून या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नव्हतं. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर नवीन नियामक मंडळानं जीवनगौरव पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि त्यानुसार हे पुरस्कार आता पार पडतील. गणेश तळेकर, प्रशांत जोशी, दिपाली घोंगे, विजय जगताप, संजय देवधर, गोविंद गोडबोले, अभिजीत झुंजारराव, प्रणीत बोडके, अशोक ढेरे, सुनिल बेंडखळे, श्याम आस्करकर आणि रितेश साळुंके अशा रंगकर्मींचाही विविध पुरस्कारांसह सन्मान केला जाणार आहे.