महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार राम-सीतेची जोडी, अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर - RAMAYANA FAME RAM SITA - RAMAYANA FAME RAM SITA

RAMAYANA FAME RAM SITA : ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपटात अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया ही रामायण फेम राम-सीतेची जोडी अभिनय करताना दिसणार आहे. निर्माता अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून याचं दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे.

Arun Govil and Deepika Chikhalia
अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 4:27 PM IST

मुंबई- RAMAYANA FAME RAM SITA : जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी 1986 ते 88 च्या दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम आणि सीतेच्या सुंदर जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात खास स्थान दिलं. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच मानाचं स्थान मिळवलं.

या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम आहे. त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा एका खास कलाकृतीतून आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माता अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे.

पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भव्यदिव्य स्वरूपात ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ रुपेरी पडद्यावर मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभी केली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्रज् आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली नसेल तरच नवल.

काही दिवसापूर्वी चित्रपटाचे निर्माता अजय आरेकर यांनी एक पोस्ट लिहून आपल्या फॉलोअर्सना या चित्रपटाबद्दलची अपडेट दिली होती. त्यांनी लिहिलं होतं. "फत्तेशिकस्त, पावणखिंड नंतर अल्मोण्ड्स क्रेएशन्स निर्मित.. निर्माते भाऊसाहेब आरेकर (दादा ) अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर यांनी निर्माता आणि दिग्दर्शक अशी दुय्यम भूमिका निभावली आहे... अशा "वीर मुरारबाजी " या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण काल पूर्णतःवास आले या चित्रपटाच्या निर्मिती व्यवस्थापकाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर सोपवली होती त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. तसेच माझी सर्व टेकनिकल टीम यांनी दिवस -रात्र मेहनत करून हे शिवधनुष पूर्णतःवास नेण्यास मदत केली. त्याचे मनपूर्वक आभार असेच तुमची साथ राहू द्या. माझ्या काही बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल. तर माफी मागतो. लवकरच पुढील ऐतिहासिक चित्रपट "रामशेज "च्या चित्रीकरणाला लवकरच भेटू, असेच तुमचे प्रेम आणि साथ राहू द्या."

ABOUT THE AUTHOR

...view details