मुंबई - अभिनेत्री म्हणून अनन्या पांडे आज हिंदी चित्रपट सृष्टीत स्थिरावत चालली आहे. आपल्या अभिनयाच्या आणि देखण्या सौंदर्याच्या जीवावर तिनं आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या टीन एजर चित्रपटातून तिनं अभिनयात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून, स्टार किड कॅमिओ वगळता आठ चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे आणि उद्योजिका भावना पांडे यांची मुलगी असलेल्या अनन्यानं 'स्टार किड' लेबलसह इंडस्ट्रीत प्रवेश केला. फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून आली असली तरी तिनं आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
एक अभिनेत्री म्हणून जवळपास सहा वर्षांत, अनन्यानं वेगवेगळ्या भूमिकातून आपलं अष्टपैलुत्व दाखवलं आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या रोमँटिक ड्रामापासून सुरुवात करून, तिनं 'पती पत्नी और वो' आणि 'ड्रीम गर्ल 2' यांसारख्या विनोदी चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिनं विजय देवरकोंडाच्या बरोबर 'लायगर' या पॅन इंडिया चित्रपटातही आपली कमाल दाखवली होती. त्यानंतर तिनं शकुन बत्राच्या 'गेहराइयाँ' या रिलेशनशिप ड्रामा चित्रपटामध्ये तिनं दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी या कलाकारांसह आपली उपस्थिती दर्शवली होती.