मुंबई- मुंबईकर क्रिकेट खेळाडू सरफराजची भारतीय कसोटी क्रिकेट संघात निवड झाली. राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं दमदार पदार्पण केलं. यामध्ये फलंदाजी करताना त्यानं पहिल्या सामन्यात 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्या अगोदर सामना सुरू होण्यापूर्वी सरफराजला क्रिकेटपटू अनिल कुंबळेनं भारतीय संघाची कॅप दिली. हा लेकाचा होणारा गौरव पाहणाऱ्या सरफराजचे वडील नौशाद खान यांचं हृदय भरुन आलं होतं. त्यांनी आपली हिंमत न हारता मुलासाठी निर्माण केलेल्या प्रेरणादायी आदर्शला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सलाम केलाय.
हा माझा सन्मान असेल -आनंद महिंद्रा यांनी नुकतीच एक्स या सोशल मीडिया हँडलवरुन घोषणा केली आहे. त्यांनी सरफराजचे वडील नौशाद खान यांना थार जीप स्वीकारण्याची विनंती केली आहे. महिंद्रा यांनी आपल्या एक्सवर लिहिलंय, "कठीण परिश्रम. धाडस. संयम. मुलामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी वडिलांकडे देण्यासाठी यापेक्षा चांगले गुण कोणते पाहिजेत? एक प्रेरणादायी पालक म्हणून, नौशाद खान जर थारची भेट स्वीकारतील तर हा माझा बहुमान आणि सन्मान असेल."
उद्योगपती आनंद महिंद्रांच्या या ऑफरला नौशाद खान कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागले. नौशाद यांना स्वतः क्रिकेटर व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, पण अनेक अडथळ्यांमुळे त्यांचं हे स्वप्न अपुरं राहिलं होतं. त्यांनी आपलं हे स्वप्न आपल्या दोन्ही मुलांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांचा मुलगा सरफराजनं भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं आहे. त्याचा हा संघर्ष वडिलांच्या त्यागामुळे आहे, याची जाणीव त्याला आहे.
सहा वर्षापासून क्रिकेटचं प्रशिक्षण -इंग्लंड संघाच्या विरुद्ध राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या पदार्पणाच्या सामन्यानंतर सरफराज खाननं सांगितलं की, तो सहा वर्षांचा असताना त्यानं क्रिकेटचं प्रशिक्षण सुरू केलं. वडिलांसमोर भारतीय संघातून खेळण्याचं त्याचं स्वप्न होतं. सरफराजचे वडील नौशादही खूप खुश होते. आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी राजकोटला येण्याचं ठरवलं नव्हतं. सामन्याच्या आदल्या दिवशीच ते येथे पोहोचले. यावेळी खान कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.
हेही वाचा -
- 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- रणवीर सिंग स्टारर 'शक्तिमान'चे कधी शूटिंग सुरू होणार? जाणून घ्या तपशील
- रवी किशन स्टारर कोर्टरूम ड्रामा 'मामला लीगल है'चा धमाल ट्रेलर लॉन्च