मुंबई - Amitabh Bachchan announces T20 World Cup 2024 :अभिनेता अमिताभ बच्चननं त्यांच्या आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातील 'अश्वत्थामा'च्या भूमिकेत टी 20 वर्ल्ड कप 2024 ची घोषणा केली आहे. याशिवाय, त्यानं भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू, रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय टी 20 वर्ल्ड कप संघातील इतर खेळाडूंनाही विशेष संदेश दिला आहे. या संदेशाद्वारे त्यानं खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे. या घोषणेनंतर, गेल्या बुधवारी आयपीएल 2024 च्या सामन्यादरम्यान एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये अमिताभ 'अश्वत्थामा' च्या भूमिकेत खेळाडूंना शुभेच्छा देताना दिसत आहे.
अमिताभ बच्चनचा टी 20 वर्ल्ड कप 2024चा प्रोमो रिलीज : 1 मे रोजी, 'कल्की 2898 एडी' च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर टी 20 वर्ल्ड कप 2024 चा प्रोमो शेअर केला. या व्हिडिओवर त्यांनी सुंदर कॅप्शन दिलं आहे, "टी 20 वर्ल्ड कप 2024 जाहीर झाला आहे. टीम इंडियाचे सर्वात मोठे चीअरलीडर अमिताभ बच्चन यांचा खास संदेश आहे. स्टार स्पोर्ट्सनं टी-20 विश्वचषकाची ही लढाई आणली आहे. तुम्ही तयार आहात का?" व्हिडिओमध्ये 'कल्की 2898 एडी'ची पार्श्वभूमी दाखवण्यात आली होती. याशिवाय व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी एक कविता सादर केली आहे. या कवितेमध्ये म्हटलं आहे, 'हे महायुद्ध आहे, आता तयार व्हा. धाडसी बना, तुमची ताकद दाखवा, तुमची ताकद दाखवा..."
'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल :'कल्की 2898 एडी' हा आगामी चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत संतोष नारायणन यांनी दिलं आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी विशेष भूमिकेत आहेत. याआधी चित्रपट निर्मात्यांनी 'कल्की 2898 एडी'मधील एक पोस्टर टीझर रिलीज केले होते. यामध्ये अमिताभ बच्चन पूर्णपणे बँडेज आणि कपड्याने झाकलेले होते. दरम्यान, अमिताभच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'वेट्टयान' चित्रपटात रजनीकांतबरोबर दिसणार आहे.