मुंबई - LOK SABHA ELECTION 2024 : 'मेगास्टार' अमिताभ बच्चननं 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदारांना बाहेर पडून आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यानं सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओही शेअर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई शहरातील लोकसभेच्या जागांचाही समावेश आहे. अमिताभ बच्चननं इंस्टाग्रामवर एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये 'खूबसूरत' चित्रपटातील सोनम कपूरवर चित्रित केलेल्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या लोकप्रिय गाण्याच्या रिमेकवर जंगलातील प्राणी नाचताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना बिग बीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, '20 मे हा तुमचा मुंबई/महाराष्ट्राला मतदान करण्याचा दिवस आहे. तुमचा अधिकार वापरा.'
याआधी शाहरुख खाननंही सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकांना बोटांना शाई लावण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांसह बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे.