मुंबई -अभिनेता अल्लू अर्जुनची हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमधून 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता अल्लू अर्जुनच्या कठिण काळात इंडस्ट्रीतील अनेक सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. सेंट्रल जेलमधून बाहेर आल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक लोक अल्लू अर्जुनला त्याच्या जुबली हिल्स, हैदराबाद येथील निवासस्थानी भेटायला गेले होते. अभिनेता दग्गुबती व्यंकटेश, मंचू विष्णू, नागा चैतन्य यांच्यासह अनेक स्टार्सनं अल्लू अर्जुनची भेट घेतली. काही स्टार अल्लू अर्जुनला भेटल्यानंतर घराबाहेर जाताना स्पॉट झाले.
अल्लू अर्जुनच्या निवासस्थानी स्टार्सची गर्दी : गेल्या आठवड्यात अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2'च्या स्क्रीनिंगदरम्यान संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यूप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली होती. 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी तो संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी गेला होता. दरम्यान शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयानं त्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली. सुटकेनंतर व्यंकटेश डग्गुबती अल्लू अर्जुनला भेटून त्याला आपला पाठिंबा दिला. सध्या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अल्लू अर्जुनला कठिण काळात पाठिंबा देत आहेत. दरम्यान अभिनेता राणा दग्गुबती आणि नागा चैतन्यनं अल्लू अर्जुनची गळा भेट घेतली. चिरंजीवीची पत्नी सुरेखाही आपल्या पुतण्याला भेटण्यासाठी त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी पोहोचली होती. यादरम्यान अभिनेता विजय देवरकोंडा आणि 'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शक सुकुमार अल्लू अर्जुनच्या निवासस्थानी दिसले होते.