मुंबई - Reasi Terror Attack :बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्रानं जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेला यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला खूप गंभीर होता. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या 'देसी गर्ल'नं मंगळवारी 11 जून रोजी तिच्या इंस्टाग्राम या घटनेसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. निष्पाप यात्रेकरूंवर झालेला हा हल्ला भयानक आहे. फक्त सामान्य नागरिक आणि मुलेच का? आपण जगभर जो द्वेष पाहत आहोत ते समजणं फार कठीण आहे."
दहशतवादी हल्लाबद्दल देशी गर्लनं केला शोक व्यक्त : प्रियांका चोप्रा, ही युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय ॲबेसिटर देखील आहे. ती यापूर्वीही हिंसाचाराच्या विरोधात आपल्या भूमिकेबद्दल बोलली आहे. प्रियांकानं मानवतावादी संकटांविरुद्ध अनेकदा आवाज उठवला आहे. गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीची मागणी करणाऱ्या 'आर्टिस्ट फॉर सीझफायर' याचिकेवर स्वाक्षरी करणाऱ्या हॉलिवूड स्टार्सपैकी ती देखील एक आहे. रितेश देशमुख, कंगना राणौत, अनुपम खेर, वरुण धवन, आयुष्मान खुराना यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांसाठी प्रार्थना केली.