मुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट लंडनमध्ये होणाऱ्या चॅरिटी गाला, होपमध्ये होस्ट म्हणून पदार्पण करणार आहे. यात सहभागी होण्यासाठी ती गुरुवारी लंडनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. आपल्या गाडीतून उतरुन विमानतळात प्रवेश करताना नेहमी प्रमाणे तिला पापाराझींनी फोटोसाठी आग्रह धरला. घाईत जाणाऱ्या आलियानं हसून त्यांच्याकडे पाहिलं. इतक्यात तिला एका पापाराझीनं मराठीतून साद घालताना 'वहिनी नमस्कार', अशी मराठीत हाक मारली. अचानक तिला कोणतरी विमानतळावर 'वहिनी' म्हणून बोलवल्यानं तिच्या चेहऱ्यावर हसू खुललं. लाजेनं चूर झालेली आलिया हसतच सेक्युरिटी गेटच्या दिशेनं निघून गेली.
आलिया भट्ट 28 मार्च रोजी लंडनच्या मंदारिन ओरिएंटल हाईड पार्क येथे मंदारिन ओरिएंटल हॉटेल समूहाच्या सहकार्याने एका चॅरिटेबल कार्यक्रमाचे आयोजन करेल. या कार्यक्रमाला भारत आणि लंडन या दोन्ही देशातील प्रमुख उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. हा कार्यक्रम आलियाच्या निवडलेल्या चॅरिटी, सलाम बॉम्बेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला आहे.
आलियाने अलिकडेच 'जिगरा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यामध्ये ती वेदांग रैना बरोबर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील स्पष्ट फोटो शेअर करत तिने शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. 'जिगरा' सप्टेंबर 2024 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.