हैदराबाद - आरटीसी क्रॉस रोड्स येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत अल्लू अर्जुनची चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशी पूर्ण झाली आहे. साडेतीन तासांहून अधिक काळ ही चौकशी सुरू होती. तपासानंतर तो आता त्याच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी पोहोचला आहे.
पोलिसांनी सोमवारी या प्रकरणाबाबत नोटीस जारी केली आणि कायदेशीर पथकाशी चर्चा केल्यानंतर तो आज मंगळवारी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी उपस्थित राहिला होता. अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद, त्याचे काका चंद्रशेखर रेड्डी आणि निर्माता बन्नी वासू पोलिस ठाण्यात त्याच्या चौकशी दरम्यान हजर होते.
हैदराबाद सेंट्रल झोनचे डीसीपी आकांक्ष यादव यांनी वकिलांसह उपस्थित असलेल्या अल्लू अर्जुनची चौकशी केली. एसीपी रमेश आणि इन्स्पेक्टर राजूनाईक यांच्या उपस्थितीत तपास करण्यात आला.
पोलिसांनी यापूर्वीच संध्या थिएटरमधील घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या आधारे अल्लू अर्जुनला प्रश्न विचारले गेल्याची बातमी आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनला पत्रकार परिषदेत नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत विचारण्यात आल्याचेही समजते. अल्लू अर्जुनच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर चिक्कडपल्ली पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शोच्या दिवशी घडलेल्या घटनांच्या आधारे चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारे, थिएटरच्या प्रवेशद्वारावरील आणि बाहेर पडण्यासाठी साक्षीदारांकडून तपशील गोळा करण्यात आला. याच आधारे अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे.
संध्या थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक नागराजू यांना यापूर्वीच दोन दिवसांसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पोलिसांनी त्याच्याकडून बराच तपशील मिळवला आहे. नागराजू यांनी कबूल केलं आहे, की 'पुष्पा-2' प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन आणि इतर कलाकारांच्या आगमनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. थिएटर व्यवस्थापक यांनी पोलिसांसमोर मान्य केलेल्या गोष्टी यात किती तथ्य आहे याचा उलट तपास पोलिसांनी अल्लू अर्जुनशी झालेल्या चौकशामध्ये केल्याचं समजतंय.
अल्लू अर्जुनचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून, ते घटनेच्या परिणामाचा सर्व बाजूंनी तपास करणार आहेत. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी अल्लू अर्जुनच्या बाऊन्सर्सच्या वर्तनाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. खासगी कर्मचाऱ्यांना चाहत्यांनी धक्काबुक्की केल्यानं ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अँटनी नावाच्या बाऊन्सरला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. नियमानुसार बाऊन्सर नेमले जातात का? याबद्दल अल्लू अर्जुनकडून घटनेच्या विषयावर पोलिसांनी तपशील मिळवला. याप्रकरणी आणखी काही जणांना नोटिसा देऊन चौकशी केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही रॅली काढून एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून चिक्कडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्लू अर्जुनला अटक केली होती. उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर चंचल गुडा कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली होती. या घडामोडींनंतर चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात तपासासाठी उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती. चिक्कडपल्ली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बाउन्सर अँटोनीला अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून 18 जणांना आरोपी बनवले आहे.